फोटो २४ संतोष ०१
सांगलीतून धावणाऱ्या एसटीला प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी, एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. ५० टक्के बसेस अद्याप आगारातच थांबून आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना वडापचाच आधार घ्यावा लागत आहे.
शहरे सुरू झाल्याने ग्रामीण भागाची धाव आता शहरांकडे सुरू झाली आहे. वैद्यकीय उपचार, पोलीस ठाणे, पंचायत समित्या व जिल्हा परिषद आदी कारणांनी ग्रामस्थांचा प्रवास सुरू झाला आहे. खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांचीही धावपळ सुरू आहे. अनेक खासगी संस्था सुरू झाल्याने तेथील कर्मचारी वर्गही ड्युटीवर निघाले आहेत. शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने त्यांनाही एसटीची गरज आहे. प्रवासी रस्त्यावर येऊ लागले तरी, एसटी मात्र पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आलेली नाही. काही चांगल्या उत्पन्नाच्या मार्गांवरील फेऱ्याच सुरू करण्यात आल्या आहेत. विशेषत: कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, मुंबई, नृसिंहवाडी, पंढरपूर आदी मार्गांवर गाड्या धावताहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून सांगलीसाठी तासाला एक गाडी सोडली जात आहे. ग्रामीण भाग मात्र एसटीपासून अजूनही वंचित आहे.
बॉक्स
ग्रामीण भागात प्रतीक्षा एसटीची
१. प्रत्येक तालुक्यातून सांगलीसाठी एसटी धावत आहे, पण तालुकांतर्गत गाड्या मात्र बंदच आहेत. अगदी मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही बसेस सोडलेल्या नाहीत.
२. सांगली व मिरजेतून जवळच्या काही गावांना शहरी बससेवा सुरू करण्यात आली आहे, पण तेथून पुढे जाण्यासाठी ग्रामीण बसेस धावलेल्या नाहीत.
३. जत, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, आटपाडी, पलूस आदी तालुक्यांतील मोठी गावे एसटीच्या प्रतीक्षेत आहेत.
४. सलगरे, ढालगाव, माडग्याळ, आरग, भिलवडी आदी मोठ्या बाजारपेठेच्या गावांनाही एसटी बस सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
बॉक्स
सांगलीतून वडाप जोर धरतेय...
- सांगली व मिरजेतून काही मार्गांवर वडाप जोर धरू लागले आहे. काळ्या-पिवळ्या गाड्या स्थानकाबाहेर थांबू लागल्या आहेत.
- मिरजेतून कुरुंदवाड, म्हैसाळ, आरग आदी मार्गांवरही वडाप गाड्या सुरू केल्या आहेत. विशेषत: नृसिंहवाडी व शिरोळसाठी गर्दी दिसत आहे.
- सांगलीतून मिरजेसाठी शहर बससेवा सुरू झाली असली तरी, खासगी रिक्षांनी हा मार्ग हायजॅक केला आहे. बसेस रिकाम्या, तर रिक्षा भरभरून धावत असल्याचे चित्र दिसत आहे.
पॉईंटर्स
एकूण बसेस ७१०
सध्या सुरू असलेल्या बसेस ३७०
आगारातच उभ्या बसेस ३४०
एकूण चालक-वाहक २,६००
चालक १३००
वाहक १३००
सध्या कामावर चालक ५३४
सध्या कामावर वाहक ५३४
कोट
सध्या तरी वडापचाच आधार
गावात रुग्णसंख्या जास्त असल्याने एसटी सुरू झालेली नाही. सांगलीला जाण्यासाठी काळी-पिवळीचाच आधार आहे. तातडीच्या कामासाठी दुचाकीचा प्रवास करतो. एसटी प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने मोठ्या गावांना फेऱ्या सुरू केल्या पाहिजेत.
- सुरेश भोसले, प्रवासी, धुळगाव
वैद्यकीय उपचार आणि शेतीच्या कामासाठी वारंवार सांगली, मिरजेला जावे लागते. त्यासाठी वडापचा आधार घ्यावा लागतो. दिवसभरात तीन ते चार गाड्या गावातून निघतात. संध्याकाळी परतायला उशीर झाला, तर वडापदेखील मिळत नाही. त्यामुळे एसटीने किमान मुक्कामाच्या गाड्या तरी सुरू केल्या पाहिजेत.
- अभिजित गायकवाड, पलूस