दहिवडी : महाशिवरात्रीला शंभू महादेवाच्या दारात कुस्ती खेळली म्हणजे त्याचे आशीर्वाद मिळतील या श्रद्धेने शिखर शिंगणापूर येथे महाशिवरात्रीच्या यात्रेत मल्लांची कुस्ती व्हायची. १९७० च्या सुमारास नियोजनाच्या अभावामुळे ही परंपरा खंडित झालेली होती. आता सुमारे पन्नास वर्षांनंतर ही परंपरा तरुणाईच्या पुढाकाराने पुन्हा सुरू होत आहे.
यावर्षी ५० वर्षांनंतर प्रथमच शिंगणापूरचे उपसरपंच पैलवान शंकर तांबवे व वीरभद्र कावडे यांनी गावची ही परंपरा पुन्हा एकदा सुरू करण्याचं ठरविलं आहे. एक हजारापासून एक लाखापर्यंत लहान-मोठ्या शंभर कुस्त्या खेळवल्या जाणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचा ही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने केला जाणार आहे. महाशिवरात्री यात्रेत शिंगणापूरमध्ये अखेरची कुस्ती झाली ती पाहण्यासाठी परिसरातील सुमारे दोन हजार ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यातील १२५ मल्लांनी यात हजेरी लावली होती. या स्पर्धेतील विजेत्याला त्यावेळी तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. पूर्वी आर्थिक बक्षिसांपेक्षाही शंभू महादेवाच्या आशीर्वादासाठी येथे खेळायला येणाऱ्यांची संख्या मोठी होती.
दरम्यान, हरहर महादेवचा गजर करीत शेकडो मैलाची पायपीठ करीत कावडीसह शिंगणापुरात भाविक दाखल झाले आहेत. रविवार, दि. २५ रोजी सायंकाळी चार वाजता ध्वज बांधण्याचा कार्यक्रम तर रात्री बारा वाजता लग्नसोहळा होणार आहे. या निमित्ताने मराठवाडा, विदर्भ, आंध्र, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील भाविक कावडी घेऊन शिंगणापुरात दाखल होऊ लागले आहेत.यात्राकाळात दहिवडी, नातेपुते, सातारा, बारामती, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणांहून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
लग्न सोहळा झाल्यानंतर मंगळवार, दि.२७ रोजी देवाची लग्नाची वरात निघणार असून, दि. २८ रोजी कावडी मुंगी घाटातून वर चढणार आहेत. त्याच दिवशी रात्री बारा वाजता महादेवाला कावडीसोबत आणलेल्या पाण्याचा अभिषेक धार घातली जाते.
महाशिवरात्रीच्या यात्रेत शिंगणापूरला मोठा कुस्त्यांचा फड भरत होता. यात्रेसाठी येणारे भाविक कुस्तीचा आखाडा पाहण्यासाठी थांबायचे. आपल्या लाडक्या पैलवानाने कुस्ती जिंकली की फेटा उडवून त्याचं कौतुक करण्याची तेव्हा पद्धत होती. पुन्हा एकदा कुस्तीचा फड सुरू होतोय याचा अभिमान वाटतो.- मोहनराव भोसले-पाटील,माजी पोलीस पाटील.