कोरोनामध्ये गर्भवतींनी काय काळजी घ्यावी अशी विचारणा सातत्याने होत आहे. खरंतर अशा प्रचंड उलथापालथीच्या काळात गर्भधारणा शक्यतो टाळणेच जास्त योग्य ठरेल !
गर्भवतींची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे एरवीसुद्धा त्यांना जंतू प्रादुर्भावापासून सुरक्षेसाठी काळजी घेण्यास आम्ही सांगत असतो. गर्भावस्थेच्या
पहिल्या तीन महिन्यांत गर्भाचे अवयव तयार होत असतात. कोरोनाचा संसर्ग झाला तरी गर्भामध्ये व्यंग होत नाही असे आढळून आले आहे. पण संसर्गामुळे गर्भपाताचा धोका मात्र वाढतो. त्यामुळेच गर्भवतींनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. कोरोनाबाधित असलेल्या पण लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या श्वसनमार्गातील स्रावांमधून विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. बाहेर जावेच लागले तर दरवाजाचे हँडल्स, जिन्यांचे रेलिंग्स, कट्टे, कठडे अशा ठिकाणी स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करा.
नाका-तोंडावर मास्क असायलाच हवा. सॅनिटायझर व साबणाचा भरपूर वापर करून हात वारंवार धुवा. बाहेरून आल्यावर हात, पाय, तोंड स्वच्छ धुवा. कपडे बदला.
पोट दुखणे, अंगावरून रक्त किंवा पाणी जाणे, बाळाच्या हालचाली मंदावणे, तीव्र डोकेदुखी अशी काही लक्षणे असतील तर मात्र कोरोनाच्या भीतीने घरी बसू नका, त्वरित डॉक्टरांना भेटा. गर्भवतींनी रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ नये म्हणून भरपूर फळे खावीत. संत्री, मोसंबी ही लिंबूवर्गीय फळे सी जीवनसत्वाने युक्त असतात, श्वसन मार्गातील संसर्गापासून रक्षण करतात.
गर्भवतीला जर कोरोनाचा संसर्ग झाला, तर अन्य रुग्णांप्रमाणे सरकसकट औषधे देता येत नाहीत. गर्भाला काही धोका किंवा व्यंग उद्भवू नये याची काळजी घ्यावी लागते. गर्भवतींची पचनक्रिया, चयापचय क्रिया बदललेली असते, त्यामुळे औषधांचे परिणाम इतरांपेक्षा वेगळे असू शकतात. सातव्या महिन्यानंतर वाढत्या गर्भामुळे गर्भवतीच्या फुप्फुसावर दाब असतो, कार्यक्षमता कमी असते, त्यामुळे संसर्ग झाल्यास व्हेंटिलेटर्स लावणे गुंतागुंतीचे ठरू शकते.
गर्भवती मातेला कोरोनाचा संसर्ग झाल्यास तो वारेतून गर्भापर्यंत सहसा पोहोचत नाही असे आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आले आहे, त्यामुळे संसर्ग झालाच तर गर्भाची काळजी करू नका. कोरोनाबाधित गर्भवतीला प्रसूतीनंतर बाळाला फार हाताळता येणार नाही. योग्य काळजी घेऊन स्तनपान मात्र सुरू ठेवता येईल. गर्भवतींनी योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होणार नाही. अर्थात, कोरोनाची बाधा झालेले सर्वच रुग्ण अत्यवस्थ होत नाहीत, मृत्यू पावत नाहीत, ही दिलाशाची बाब ठरते. गर्भवतींनी कोरोनाची लस घेणे तूर्त टाळावे, यथावकाश याबाबतीत गाइडलाइन्स येतील, तेव्हाच याबाबत सांगता येईल.
( लेखिका पलूस येथे स्त्री आरोग्य व प्रसूती तज्ज्ञ आहेत.)