मिरज : मिरजेत सांगली रस्त्यावर असलेल्या एका बिअरबारसमोर शनिवारी मध्यरात्री बारमधील कामगाराला मारहाण केल्याच्या रागातून बारमालकासह चाैघांनी दाेघांना बेदम मारहाण केली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बार व वाईन शॉप बंद असतानाही मिरजेत मध्यरात्री एका बारसमोर दारूवरून हाणामारी झाली. या घटनेबाबत गांधी चाैक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली रस्त्यावर असलेल्या वैभव बिअरबारसमोर मध्यरात्री झालेल्या हाणामारीत फिरोज इम्तियाज ढोले व त्याचा मित्र यासिन मकानदार हे दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत जखमी फिरोज इम्तियाज ढोले (वय ३०, रा. ईदगाह नगर, मिरज) याने गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे. फिरोज ढोले याचा मित्र धनंजय भोसले हा मध्यरात्री दीड वाजता मद्य घेण्यासाठी वैभव बारमध्ये गेला होता. मद्य घेतल्यानंतर चारचाकी बंद पडल्याने त्याने मित्र फिरोज ढोले याला हॉटेल वैभव येथे बोलावले. फिरोज हा यासिन मकानदार याच्यासोबत हॉटेलजवळ गेला. यावेळी तेथे धनंजय भोसले याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा थांबला होता. फिरोज याने त्या अल्पवयीन मुलाची चौकशी केल्यानंतर धनंजय याने हा मुलगा बारमध्ये मद्य पोहोच करायचे काम करतो, असे सांगितले. फिरोज याने त्या मुलाला ‘तू अल्पवयीन आहेस, असले काम करू नकोस’, असे सांगितले. यावर उद्धट उत्तरे दिल्याने फिरोज याने त्या मुलाच्या मुस्काटात मारली. मुलाने याची माहिती बार मालकाला दिली. ताे अन्य दोघांसोबत तेथे आला. बारमालक वैभव गडदावर, आकाश गडदावर, धनंजय भोसले व अनोळखी एक अशा चौघांनी फिरोज ढोले व यासिन मकानदार यांना मारहाण केल्याने दोघेही जखमी झाले. जखमी यासिन मकानदार याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात मारहाण करणाऱ्या चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.