भिलवडी : वसगडे (ता. पलूस) येथे दोन कुटुंबांत मारामारी झाली. याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात परस्परविराेधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार, दि. २० रोजी दुपारी २:३० वाजता वसगडे येथील रोहित देवगोंडा पाटील (वय २४) यांच्या राहत्या घरासमोर वर्धमान राजगोंडा पाटील याने मोटारसायकल रेस केली. यावेळी रोहित पाटील याने ‘तू माझ्याकडे बघून गाडी का रेस केलीस’ असा जाब विचारला. यावेळी ‘तुझ्या भावासारखे तुलाही बघून घेतो’ असे म्हणून गजकुमार राजगोंडा पाटील, वर्धमान राजगोंडा पाटील, राजगोंडा नरसगोंडा पाटील या तिघांनी काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत रोहित पाटील याने तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.
दुसरी गजकुमार पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की. २० रोजी दुपारी २:३० वाजता रोहित देवगोंडा पाटील, देवगोंडा नरसगोंडा पाटील या दोघे गजकुमार राजगोंडा पाटील यांच्या घरात विनापरवाना घुसले. गजकुमार पाटील व त्यांचे भाऊ वर्धमान राजगोंडा पाटील हे दाेघे प्रशांत आदगोंडा पाटील यांच्या खुनाच्या खटल्यामध्ये साक्षीदार आहेत. याचा राग मनात धरून ‘तुला कोर्टात जाऊ देणार नाही’, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. हातातील विळ्याचा धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.