इस्लामपूर : येथील इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुरुष खुल्या गटाच्या जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेवेळी मैदानावर गुटखा थुंकण्याच्या कारणावरून इस्लामपूर व सांगलीच्या कबड्डी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. या घुमश्चक्रीत सांगलीच्या खेळाडूंनी खुर्च्यांची मोडतोड केल्याने इस्लामपूरच्या खेळाडूंनी केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी पोलिसात दाखल झाल्या आहेत. या मारहाणीत प्रदीप बाबूराव बंडगर व अवधूत संजय आरते (दोघे रा. सांगली) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंडगर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मानसिंग पाटील, पोपट पाटील, सचिन दिनकर पाटील यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गर्दी, मारामारीचा गुन्हा नोंद केला, तर मानसिंग मधुकर पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप बंडगर, अवधूत आरते, सागर सूर्यवंशी व इतरांविरुद्ध खुर्च्यांची मोडतोड व नुकसान केल्याचा गुन्हा नोंद झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. सकाळी ११ वाजता प्रदीप बंडगर व त्याचा सहकारी खेळाडू अवधूत आरते मैदानाजवळील पाण्याच्या टाकीजवळ पाणी पिण्यासाठी गेले. त्यावेळी अवधूत याने पाण्याने चूळ भरून ते पाणी मैदानावर थुंकले. याचवेळी मानसिंग पाटील हा तेथे आला. त्याने मैदानावर का थुंकलास, अशी विचारणा केल्यावर दोघांनी त्याची माफी मागितली. त्यानंतर प्रदीप बंडगर, अवधूत आरते हे सहकारी खेळाडूंसमवेत मैदानाबाहेर जात असताना, पाठीमागून आलेल्या मानसिंग पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी दोघांना खाली पाडून मारहाण केली. यामध्ये प्रदीपच डाव्या बरगडीला, तर अवधूतच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर सांगलीच्या खेळाडूंनी मैदानातील खुर्च्यांची मोडतोड केली. पोलिस हवालदार दीपक परदेशी तपास करीत आहेत. (वार्ताहर)
इस्लामपुरात कबड्डी स्पर्धेवेळी मारामारी
By admin | Published: September 05, 2016 12:11 AM