सांगली : शहरातील माळी गल्लीत बुधवारी कुळजागेच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत सुनील रघुनाथ बाबर (वय ४५) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चारजणांविरोधात फिर्याद दाखल केली असून, रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. माळी गल्लीत सुनील बाबर, दत्ता मोहिते, बाळासाहेब सदावरे, सरस्वती कुंभार, शिवाजी धोत्रे ही पाच कुटुंबे गेल्या दोन पिढ्यांपासून राजाराम माळी यांच्या मालकीच्या जागेत भाड्याने रहात आहेत. राजाराम माळी यांनी ही जागा मनोज माळी याला विकली होती. त्यानंतर मनोज माळी त्यांनी ती श्रीकृष्ण माळी यांना विकली. या जागेवर अनेक वर्षापासून काही कुटुंबे राहात आहेत. या कुटुंबांनी जागा सोडावी, यासाठी माळी यांचे प्रयत्न सुरू होते, मात्र भाडेकरू याला दाद देत नव्हते. यासंदर्भात सर्व भाडेकरूंनी तीन महिन्यांपूर्वी सांगलीच्या न्यायालयात कुळ कायद्याखाली संबंधित जागेवर दावा दाखल केला आहे. या भाडेकरूंच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. भाडेकरूंपैकी शिवाजी धोत्रे व सरस्वती कुंभार यांची घरे धोकादायक बनली होती. महापालिकेनेही ही घरे धोकादायक ठरवून त्यांना बांधकाम उतरविण्याबाबत नोटीसही बजाविली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथक संबंधित धोकादायक इमारत पाडण्यासाठी माळी गल्लीत दाखल झाले. बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटाही आणण्यात आला होता. घराचा धोकादायक काही भाग पाडून महापालिकेचे पथक पोलिसांसह माघारी फिरले. त्यानंतर श्रीकृष्ण माळी, त्याचा भाऊ श्रीहरी, श्रीराम व त्यांचा कामगार सागर राजाराम माळी हे चौघे माळीगल्लीत आले. त्यांनी भाडेकरूंची घरे जेसीबीने पाडूया, कोण काय करतेय बघू, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी माळी यांना सागर बाबर याने अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्रीकृष्ण माळी याने हातात दगड घेऊन बाबर यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याखाली मोठी इजा झाली आहे. त्याचवेळी श्रीराम माळी हे भाडेकरूंच्या घरावर चढून छतावरील लाकडे उपसून काढून टाकू लागले. यावेळी शेजारी राहणारे राजू बापू कोकाटे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने हातातील बांबू राजू यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. राजू यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आई व इतर भाडेकरू धावून आले. त्यांनाही धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे माळी गल्लीत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर येथील भाडेकरूंनी थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. सागर बाबर यांनी श्रीकृष्ण माळी, श्रीराम माळी, श्रीहरी माळी व सागर माळी या चौघांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे. (प्रतिनिधी) महापालिका इतकी तत्पर कशी? माळी गल्लीतील शिवाजी धोत्रे व सरस्वती कुंभार या भाडेकरूंची घरे धोकादायक बनली होती. या घराबाबत मूळ मालकाला महापालिकेने नोटीसही बजाविली होती. शहरातील अनेक जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. खुद्द महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे. आजअखेर अशा धोकादायक इमारतींना केवळ नोटिसा देण्याचे काम पालिकेने केले आहे. फारच दबाव असेल, तर एखादी कारवाई केली जाते. माळी गल्लीतील घरांबाबत मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. धोकादायक घरे पाडण्यासाठी कधी पोलिस बंदोबस्त घेण्यात आला नव्हता, पण इथे मात्र मोठा फौजफाटा होता. त्यामुळे या नागरिक महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करीत होते.
सांगलीत कुळाला हाकलण्यावरून मारामारी
By admin | Published: June 02, 2016 1:12 AM