जत : जत तालुक्यातील रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीने २००८-०९ मध्ये पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा योजनेची कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच आक्कळवाडी (ता. जत) ग्रामपंचायतीने २४ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले नाही, तर त्यांच्याकडून १४ लाख ९० हजार रुपये वसूल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जत तालुक्यातील रखडलेल्या ४८ पाणी पुरवठा योजनांच्या कामासंदर्भात जत येथे बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, कार्यकारी अभियंता डी. जे. सोनवणे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, उपअभियंता उदय देशपांडे, तहसीलदार सचिन पाटील व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते.
रामपूर मल्लाळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना २००८-०९ मध्ये पूर्ण केली आहे. या योजनेच्या निकृष्ट कामासंदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या होत्या. त्याची कागदपत्रे प्रशासनाने मागणी करूनही त्यांनी सादर केली नाहीत. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या बैठकीत दिले.
आक्कळवाडी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २४ डिसेंबर २०२० अखेर काम पूर्ण केले नाही, तर १४ लाख ९० हजार रुपयांची वसुली करावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.
अचकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी. बी. चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केली, म्हणून त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्यात याव्यात, असा आदेश या आढावा बैठकीत देण्यात आला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायतीचे बहुतांश सरपंच अनुपस्थित होते. त्यांचे दप्तर तपासून, दोष आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे.
चौकट
तालुक्यात खळबळ
तालुक्यात अपूर्ण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, ग्रामसेवक, टीएसपी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत व खर्च केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुक्यात खळबळ माजली आहे.