विटा : लसीकरण केंद्रावर कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस पाटील, कोतवाल व ग्राम दक्षता समित्यांनी सहकार्य करावे. होम आयसोलेशनमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. त्यांच्या घरावर कोरोना प्रतिबंधचे फलक लावण्यात यावेत. तसेच जे रुग्ण होम आयसोलेशनमधून बाहेर पडतील त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
विटा येथील खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, सभापती महावीर शिंदे, गटविकास अधिकारी संदीप पवार, पोलीस निरीक्षक संतोष डोके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे आदी उपस्थित होते.
जितेंद्र डुडी म्हणाले, ग्रामपंचायतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राना द्याव्यात. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक ठिकाणच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात चार ऑक्सिजन बेडची उपलब्धता केली जाईल. ग्राम दक्षता समितीने लसीकरण सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक गावात एक डेटा एंट्री ऑपरेटर व एक शिक्षक नोंदणीसाठी नेमावेत. जितक्या लसी दुसऱ्या दिवशी येणार आहेत. तितक्याच नोंदी झाल्या पाहिजेत, याची काळजी घ्यावी.
प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत केली आहे.
चौकट
प्रशासनाने सतर्क रहावे
विटा शहरासह खानापूर तालुक्यात एकंदरीत संपूर्ण मतदारसंघात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच स्थानिक प्रशासनानेही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी आमदार अनिल बाबर यांनी केले.