सांगली : सांगलीसह परिसरातील सेतू कार्यालयातून रहिवासी, उत्पन्न, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट चालू होती. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून या गोष्टी उजेडात आणल्यानंतर याची गंभीर दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी, नियमबाह्य शुल्क आकारणी करणाऱ्या सेतू चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा दिला. तसेच सांगलीसह परिसरातील ‘सेतू’ची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा व महाविद्यालयांतील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी, उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी सांगली, मिरज, कुपवाड शहरातील सेतू कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. अर्ज जमा करण्यासाठी, फोटो काढून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दोन ते तीन दिवस फेºया मारुनही पालकांना दाखले मिळत नाहीत. दुसºया बाजूला एजंटांकडून गेल्यानंतर मात्र लगेच दाखले मिळत आहेत.
केवळ ३४ ते ४० रुपयांना मिळत असलेल्या दाखल्यांसाठी एजंटांकडून ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात आहे. या सर्व गोष्टींवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकून तेथील गैरप्रकार उजेडात आणला होता. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाºयांनी गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी त्यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सेतू कार्यालयातील गैरप्रकार तपासणीसाठी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांची नियुक्ती केली आहे. येत्या चार दिवसात ते अहवाल देणार आहेत. यानंतर लगेचच ज्या सेतू कार्यालयात सावळागोंधळ असेल, तेथील सेतू चालकांवर दंडासह कडक कारवाई करण्यात येणार आहे.
एवढेच नव्हे, तर सेतू कार्यालयाबाहेर एजंट असतील तर सेतू चालक आणि एजंट अशा दोघांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सेतू चालकांनी शासकीय नियमानुसार ठरविलेले शुल्कच घ्यावे, त्यापेक्षा जादा शुल्क घेतल्यास तेथील सेतू चालकाचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. पालक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही नियमापेक्षा जादा शुल्क घेणाऱ्या सेतू चालकांविरोधात माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी केले आहे.तक्रार करणाºया नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. पण, संबंधित सेतू चालकांवर तात्काळ कारवाई करुन नागरिकांची लूट थांबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.अर्ज केल्यानंतर : त्याचदिवशी दाखले द्याउत्पन्न, नॉन-क्रिमिलेयर, रहिवासी असे दाखले अर्ज दाखल केल्यानंतर त्याचदिवशी सेतू चालकांनी दिले पाहिजेत. यामध्ये विलंब चालणार नाही. दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज कधी केला आणि त्यांना दाखला कधी मिळाला, याची नोंद सेतू चालकांनी ठेवली पाहिजे. तसेच या सर्व सेतू चालकांमधून रोज किती दाखल्यांचे वाटप झाले आणि अर्ज शिल्लक किती राहिले आहेत, त्याची कारणे कोणती, याविषयीची माहिती महसूल विभागाच्या संबंधित अधिकाºयांना देण्याची सूचना दिली आहे. यामुळे नक्की कोणत्या सेतू कार्यालयात गोंधळ चालू आहे, ते उघडकीस येणार आहे, असेही विजय काळम-पाटील यांनी सांगितले.