सांगली : महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अभय योजनेचा लाभ घेऊन एलबीटीची पूर्तता करावी, अन्यथा भविष्यात व्यापाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी मुदतीत एलबीटी व अभय योजनेचा अर्ज भरून द्यावा, असे आवाहन एलबीटी हटाव कृती समितीने गुरुवारी केले. शहरातील व्यापाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अभय योजनेचा अर्ज भरून द्यावा, तसेच ३१ मार्चपर्यंत एलबीटी भरावा, अन्यथा दंड व व्याजासह व्यापाऱ्यांना पैसे भरावे लागणार आहेत. त्यात कोणतीही अडचण असल्यास व्यापाऱ्यांनी कृती समितीशी संपर्क साधावा. एलबीटी कक्षातील काही अधिकारी व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. पालिकेतील कार्यशाळेत व्यापारी व प्रशासनात काही गोष्टी ठरल्या होत्या. पण तरीही विवरणपत्र भरताना अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. व्यापाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला आहे. पन्नास कोटीवरील उलाढाल असलेल्यांना एलबीटी सुरू ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाला ‘फॅम’चा विरोध आहे. याबाबत शुक्रवारी ‘फॅम’चे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुंबईतील जकात करावरही चर्चा होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
एलबीटी ३१ जुलैपर्यंत भरा, अन्यथा गंभीर परिणाम
By admin | Published: July 16, 2015 11:24 PM