सांगली : महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना तयार झाली असून, मंगळवारी ती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे सादर केली जाणार आहे. त्यामुळे या रचनेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले उमेदवार, इच्छुक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, नेते या सर्वांचेच लक्ष प्रभाग रचनेकडे लागले आहे. प्रभाग रचनेवरच निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने रचनेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. शनिवारी (दि. १७ फेबु्रवारी) पर्यंत प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत होती. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या मागदर्शनाखाली प्रारूप प्रभाग रचना तयार झाली आहे. त्यावर अंतिम हात फिरविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी ही प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे.
लोकसंख्येनुसार प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. अनुसूचित जाती जमातीसाठी प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. ओबीसी व महिला प्रवर्गासाठी २० मार्चला आरक्षण सोडत निघणार आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची समिती आहे. आयुक्तांनी तयार केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी तपासणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने ३ मार्चपर्यंत प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.
१३ मार्चपर्यंत आयोगाची मान्यता मिळेल. २० मार्चला आरक्षण सोडत निघणार आहे. यावर हरकती व सूचना मागण्यासाठी २३ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत मुदत आहे. १६ एप्रिलला हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. २ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी यावेळी चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे सध्याची दोन सदस्यीय प्रभाग रचना संपुष्टात येणार आहे. महापालिकेच्या नव्याने नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेत प्रभागाचा विस्तार होणार असून, २२ ते २५ हजार मतदार यामध्ये असणार आहेत.त्यामुळे या प्रभाग रचनेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या अनेक इच्छुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नाराजी आहे. नागरिकांतही याबाबत नाराजी व्यक्त होत असून प्रभागातील विकासकामांसाठी, समस्यांसाठी चारपैकी कोणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.इच्छुकांचे देव पाण्यातमहापालिका निवडणुकीसाठी तिन्ही शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे. लोकांशी संपर्क वाढविणे, विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या नावाचा आणि कार्याचा डंका पिटण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. केलेल्या या कष्टाचे चीज प्रभाग रचनेमुळेच होणार आहेत. त्यामुळे मनाप्रमाणे प्रभाग रचना पडावी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. प्रभाग रचनेवरच निवडणूक लढविण्याबाबतचा फैसलाही अवलंबून असल्याने या टप्प्यातच अनेकांच्या भवितव्याचाही फैसला होण्याची शक्यता आहे.शंका-कुशंकांचा जन्मनिवडणुकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सध्या सुरू असतानाच, याबाबत आतापासून शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांना भाजपबद्दल शंका वाटत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दबक्या आवाजातील चर्चेला आरोप-प्रत्यारोप आणि तक्रारींचे स्वरूप प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.