कुपवाड : महापालिकेच्यावतीने कुपवाड शहर आणि परिसरातील ड्रेनेज योजनेच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यामुळे शहर परिसरातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात नव्याने झालेल्या सोसायट्या आणि नगरांचा समावेश या आराखड्यात सूचवावा. शहरातील सर्व भागाचा समावेश झाल्यानंतरच या ड्रेनेज योजनेचा अंतिम आराखडा पुढील आठवड्यात शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
महापालिकेच्या प्रभाग समिती तीनच्या सभागृहात कुपवाड ड्रेनेज योजनेच्या अंतिम आराखड्यासह शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कापडणीस बोलत होते. बैठकीस सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक प्रकाश ढंग, विष्णू माने, शेडजी मोहिते, राजेंद्र कुंभार, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मुश्ताक रंगरेज उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्यावतीने नगरसेवकांना कुपवाड ड्रेनेज योजनेचा कच्चा आराखडा दाखविण्यात आला. त्यामध्ये कुपवाड शहरातील बहुतांश भाग नमूद नसल्याचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले. त्याची नगरसेवकांनी माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना नगरसेवकांची भेट घेऊन नमूद नसलेल्या भागाचा ड्रेनेज आराखड्यात नव्याने समावेश करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी प्रभाग दोनमधील शिवशक्तीनगर आणि चौगुले मळा या भागाला एक दिवसाआड पाणी येते. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे शिवशक्तीनगर आणि चौगुले मळा हे भाग मिरजेच्या अमृत योजनेला जोडावेत, अशी मागणी केली. कुपवाडला जादा दाबाने पाणी द्यावे, अशी मागणी इतर नगरसेवकांनी केली.
नगरसेवक विष्णू माने आणि राजेंद्र कुंभार यांनी कुपवाड शहर परिसरातील नाल्यांची सफाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी आयुक्तांनी सांगलीच्या ठेकेदारांकडून कुपवाडची नालेसफाई दोन दिवसांत सुरू करावी, असे आदेश दिले. नगरसेवक शेडजी मोहिते यांनी औषध फवारणीचे ट्रॅक्टर प्रत्येक प्रभागाला एक दिल्यास फवारणीचे नियोजन व्यवस्थित होईल, अशी मागणी केल्यानंतर आयुक्तांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. याबरोबरच बंद असलेली धूर फवारणी त्वरित सुरू करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली.
बैठकीस महापालिका आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, वैद्यकीय अधिकारी रवींद्र ताटे, नगर अभियंता पी. एम. हालकुंडे, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता अमीर मुलाणी, प्रज्ञावंत कांबळे, नितीन आळंदे उपस्थित होते.