म्हैसाळ : सांगली जिल्ह्यात गुरूवारी एका दिवशी ९२१ रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आले व १७ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना म्हणून मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेरेषेवर नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.
मिरज-कागवाड हा कर्नाटकात जाणारा मुख्य मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करीत असतात. मिरज ही आरोग्य पंढरी असल्याने कर्नाटक राज्यातील अनेक रूग्ण मिरजेतील रुग्णालयात येत असल्याने या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यापूर्वी या सीमारेषेवर कर्नाटक शासनाच्या वतीने कर्नाटक पोलीस व कर्नाटक आरोग्य विभागाच्या वतीने नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना कर्नाटक सरकारकडून कोरोना चाचणी सक्तीची केली होती. त्या कारणाने अनेक लोक कर्नाटकात अनावश्यक प्रवास करणे टाळत होते. या उलट महाराष्ट्र राज्याच्या वतीने या सीमारेषेवर कोठेही नाकाबंदी नसल्याने कर्नाटकातील अनेक जण या मार्गाने प्रवास करीत होते. त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी महाराष्ट्र पोलीस व आरोग्य विभागाकडून केली जात नव्हती. अखेर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी सुरू करण्यात आली.
चौकट
आरोग्य विभागाचा तंबू कधी?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेरेषेवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी सुरू करण्यात आली. पण आरोग्य विभागही त्याच्याबरोबर असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाचा तंबू लागणे गरजेचे आहे.
कोट
आम्ही अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व वाहनांना शासनाच्या नियमानुसार प्रवेश देत आहोत. जे लोक कर्नाटकातून महाराष्ट्रात अनावश्यकपणे प्रवास करत आहेत. त्यांना सीमारेषेवरूनच परत पाठवत आहोत.
- अभिजित वाघमारे, पोलीस कर्मचारी