दिघंची : पुजारवाडी-दिघंची (ता. आटपाडी) येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे व होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच तहसीलदार सचिन मुळीक यांनी तातडीने ग्रामपंचायतीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.
सरपंच अनिता होनमाने, उपसरपंच चैत्राली मिसाळ, ब्रह्मदेव होनमाने, किरण मिसाळ, धनंजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार मुळीक म्हणाले, पुजारवाडीत आरोग्य उपकेंद्र असून कोरोनाची तपासणी पुजारवाडीतच केली जाईल. आतापासून रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. दूध संकलन केंद्रे सकाळी व सायंकाळी फक्त एक तास सुरू राहतील. लोकसंख्येच्या मानाने रुग्णसंख्या जास्त असल्याने कडक निर्बंध लावले जातील. किराणा मालाची दुकाने सात दिवस बंद राहतील.
आरोग्य सेवक पी. एस. जमदाडे, प्रवीण गुरव, पल्लवी रणदिवे, कल्पना पवार, अर्चना डुबुले, भैया तांबोळी, महादेव पवार आदी उपस्थित होते.