सांगली : पेट्रोलच्या किमतींनी सांगलीत अखेर शंभरी पार केली. रविवारी सकाळी सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात पॉवर पेट्रोलची १००.१८ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री सुरू झाली. साधे पेट्रोल ९७.३४ रुपयांवर पोहोचले. डिझेल ८७.०५ रुपयांनी विकले जात होते.
गेल्या दशकभरातील या विक्रमी आणि उच्चांकी किमती ठरल्या आहेत. राज्यभरात अन्यत्र पेट्रोलने यापूर्वीच शंभरी गाठली होती; पण सांगलीत मात्र ते आटोक्यात होते. साधे पेट्रोल गेले आठवडाभर ९५ रुपयांच्या आसपास घुटमळून रविवारी सकाळी ९७.३४ रुपयांवर पोहोचले. दररोजची १५ ते ३० पैशांची दरवाढ पाहता येत्या आठवड्यात तेदेखील शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत पॉवर पेट्रोलची विक्री पंपचालकांसाठी मोठीच डोकेदुखी ठरली आहे. ते खपविण्यासाठी तेल कंपन्यांकडून दबाव येत आहे, मात्र साध्या पेट्रोलच्या किमतीचा भडका उडत असताना पॉवर पेट्रोल ग्राहकाला कसे पचनी पडेल? हा प्रश्न पंप चालकांपुढे आहे.
इंधनाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांचे बजेट कोलमडवून टाकत आहेत. डिझेल दरवाढीने मालवाहतुकीचे भाडे यापूर्वीच वाढले आहे. आता रिक्षा संघटनाही भाडेवाढीच्या पवित्र्यात आहेत. खासगी लक्झरी वाहतूकदारही जादा प्रवासी भाडे आकारणी करीत आहेत. एस.टी.ने अद्याप भाडेवाढ केलेली नसल्याने वडाप व्यावसायिकांनी अद्याप संयम राखला आहे.
चौकट
आज पुन्हा दरवाढ?
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ व १५ तारखांना किमतीचा आढावा घेतात. त्यानुसार आज, सोमवारी इंधनाच्या किमतीत पुन्हा काहीशी दरवाढ होऊ शकते. गॅसचे दर तीनच दिवसांपूर्वी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत; त्यामुळे ते तूर्त स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
चौकट
रविवारचे दर : पॉवर पेट्रोल १००.१८ रुपये, साधे पेट्रोल ९७.३४, डिझेल ८७.०५ रुपये.