सचिन लाड --सांगली -जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेच्याद्दष्टीने रक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ‘वॉकीटॉकी’ मिळाली आहे. कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना वॉकीटॉकी घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून तीन लाखांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याने रक्षकांच्या हातात वॉकीटॉकी दिसत आहे.सांगलीचे कारागृह फार जुने आहे. कारागृहाच्या परिसरात लोकवस्ती वाढली आहे. टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. कारागृहात काय सुरू आहे, हे इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना सहजपणे दिसते. त्यामुळे सुरक्षेच्याद्दष्टीने कारागृहास धोका वाढला आहे. कारागृहाची इमारतही वेडीवाकडी आहे. गेटपासून ते कैद्यांच्या बऱ्याकपर्यंत अंदाजे तीनशे मीटरचे अंतर आहे. एखाद्या कैद्यास किंवा रक्षकास कामानिमित्त बोलवायचे असेल, तर गेटपासून एक कर्मचारी आत पाठवावा लागतो. हा कर्मचारी आत जाऊन निरोप देऊपर्यंत पंधरा-वीस मिनिटाचा कालावधी जातो. कैद्यांमध्ये किरकोळ वाद व मारामारीचे प्रकार घडतात. तिथे बंदोबस्तासाठी रक्षक असतात. पण त्यांची संख्या अपुरी असते. आणखी रक्षकांना मदतीसाठी बोलावून मारामारी सोडवायची असेल, तर तेथून गेटपर्यंत चालत यावे लागते. कारागृहात मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने रक्षकांचा तसेच अधिकाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे वॉकीटॉकीची गरज निर्माण झाली होती.जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्येक महिन्यास कारागृहाला भेट असते. या भेटीदरम्यान अधीक्षक एम. एस. पवार यांनी सुरक्षेच्याद्दष्टीने रक्षकांना वॉकीटॉकी गरज असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्यांनी यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन तीन लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. गेल्या महिन्यात दहा वॉकीटॉकी खरेदी केल्या. कारागृहाच्या तीनशे मीटरच्या अंतरात महत्त्वाच्या ठिकाणी काम करणाऱ्या रक्षकांना वॉकीटॉकी देण्यात आली आहे. यामध्ये स्वयंपाक विभाग, रुग्णालय, कैद्यांचे बऱ्याक, गेट किपर, राखीव रक्षकविभाग, मुख्य गेट, अधीक्षक विभाग, टॉवरवरील रक्षक यांना वॉकीटॉकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे व सातत्याने हेलपाटे मारणे बंद झाले आहे. सुरक्षेच्याद्दष्टीनेही कारागृह रक्षकांना वॉकीटॉकीची मोठी मदत झाली आहे. कवलापूरच्या जागेची प्रतीक्षा सुरक्षेच्याद्दष्टीने हे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर हलविले जाणार आहे. यासाठी अधीक्षक एम. एस. पवार यांनी २५ एकर जागेची मागणी केली आहे. जागा मागणीचा हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. पण या प्रस्तावास अजूनही मंजुरी मिळाली आहे. ती कधी मिळणार, याची कारागृह प्रशासनास प्रतीक्षा लागून राहिली आहे. कारागृहासह आरटीओ कार्यालय, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय आदी कार्यालये भविष्यात कवलापुरातील याच जागेवर होणार आहेत.
अखेर कारागृह रक्षकांना मिळाली ‘वॉकीटॉकी’!
By admin | Published: March 25, 2016 11:25 PM