सांगली : रिक्षाचालकांच्या कागदपत्रांत तांत्रिक दोष काढून मदतीचे प्रस्ताव फेटाळल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर रिक्षाचालकांच्या बँक खात्यांत दीड हजार रुपये जमा होऊ लागले आहेत.
शासनाने कोरोनाकाळात रिक्षाचालकांना मदतीसाठी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मदतीसाठीच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या आधार कार्डवरील जन्मतारीख व परवान्यावरील जन्मतारीख वेगवेगळी असल्याचे अर्ज फेटाळले जात होते. सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कांबळे यांच्याकडे वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, विध्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतीचे राजू रसाळ यांनी अडचण मांडली.
कांबळे यांनी अर्जावर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे रिक्षाचालकांची बाजू मांडली. आधार कार्डवरील व परवान्यावरील जन्मतारखेतील विसंगतीमुळे प्रस्ताव फेटाळू नयेत, असे सांगितले. वीस वर्षांपूर्वीचा परवाना असेल तर तो ग्राह्य धरावा, २०१५ नंतरचा परवानाही ग्राह्य धरावा अशी शिफारस केली. त्याची दखल घेत वरिष्ठांनी अर्ज मंजूर केले. त्यामुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यांवर मदत जमा होऊ लागली आहे.
चौकट
पुन्हा अर्ज करा
मदतीसाठी ऑनलाईन दाखल केलेले अर्ज जन्मतारखेतील विसंगतीमुळे संगणकीय प्रणालीने फेटाळले आहेत. रिक्षाचालकांनी ते पुन्हा ऑनलाईन भरावेत, अधिकाऱ्यांनी ते मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीसाठी तातडीने अर्ज पुन्हा द्यावेत, असे आवाहन रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.