कोकरुड : वाकाईवाडी (ता. शिराळा) येथील लोकांच्यासाठी ग्रामपंचायतीने पिण्याचा पाण्याचा टँकर सुरू केल्यावर येथील पाणी प्रश्न सुटला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
वाकाईवाडी पाणी प्रश्नासंबंधी दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. वाकाईवाडी येथील बावीस वर्षांपासूनची नळ पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. नवीन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यास मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पाण्यासाठी लोकांना एक किलोमीटर अंतरावरून पायपीट करावी लागत होती. याबाबत मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन निवेदन दिले होते. यावेळी ग्रामसेवक सतीश जगताप यांनी पाण्याचा टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे वाकाईवाडी येथे मंगळवारी टँकर सुरू करण्यात आला असून काही दिवसांसाठी येथील पाणीप्रश्न सुटला असला तरी कायमस्वरूपी योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.