महालिंग सलगर ।कुपवाड : कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाकडून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. तशातच रिझर्व्ह बँकेकडून फक्त खासगी आणि शासकीय बँकांपुरते ईएमआय स्थगितीचे आदेश दिले आहेत. पतसंस्था, फायनान्स कंपन्यांसह इतर वित्तीय संस्थांचे यामुळे चांगलेच फावले आहे. त्यांनी ग्राहकांकडे दंडाची भीती दाखवून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने या वित्तीय संस्थांविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणारे गोरगरीब मजूर, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. अशा नागरिकांनी विविध गरजा भागविण्यासाठी कर्जपुरवठा करणाºया पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांना अधिकप्रमाणात पसंती देतात.
या वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी संचारबंदीच्या कालावधित एसएमएस आणि मोबाईलद्वारे ग्राहकांना संपर्क साधत आहेत. त्यांना तुमचे सिव्हिल खराब होईल. दंड, व्याज भरावे लागेल, अशी भीती घालत आहेत.
या वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी संसर्गाची भीती असूनही काही ठिकाणी ग्राहकांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे या वित्तीय संस्थांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासनाने या वित्तीय संस्थांवरही निर्बंध लावावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.