हणमंत पाटीलसांगली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पदावर असताना अनेक सहकारी आमदारांना मदत केली. मात्र, आर. आर. पाटील यांच्या पत्नी व आमदार सुमनताई पाटील यांची विकासकामांच्या निधीसाठी राजकीय हेतूने अडवणूक सुरू असल्याचे समोर आले. गेल्या दोन वर्षांपासून विरोधी पक्षात असल्याने निधीसाठी भेटून अनेकदा पत्र देऊनही अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तासगाव विधानसभेच्या आमदार सुमनताई पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रावरून ही बाब समोर आली आहे. चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कामांचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे शुक्रवारी आढावा बैठक बोलविली होती. त्याचे निमंत्रण सुमनताई पाटील यांनाही दिली होते. मात्र, आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी मंत्री चव्हाण यांना भेटून तीन ते चारवेळा पत्र दिले. त्यानंतरही निधी मिळाला नाही. त्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहून सुमनताई पाटील यांनी चव्हाण यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.सुमनताई पाटील पत्रात म्हणतात..
‘आपले कामांच्या आढावा बैठकीचे निमंत्रण मला मिळाले. त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. वास्तविक डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथील अधिवेशनादरम्यान माजी खासदार विजय दर्डा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपली भेट झाली होती. त्यावेळी मी आपणास मतदारसंघासाठी निधी देण्याची विनंती केली होती. त्यावर आपण स्वर्गीय आबांचा उल्लेख करून असे सांगितले, की मी कोणत्याही पदावर नसताना आबांनी मला भरपूर मदत केली. त्यामुळे आपण काळजी करू नका. त्यानंतर चार-पाच दिवसांनंतर मी आपणास कामांची यादी घेऊन भेटली; परंतु आपण निधी देण्याबाबत असमर्थ आहोत, असे सांगून अजितदादांना भेटा तरच निधी मिळेल, असे सांगितले. पुन्हा मार्च २०२४ मधील अधिवेशनात आपणास भेटून कामांची यादी दिली, तरीही आपण मला निधी देण्यास असमर्थता दर्शवून मला निधी देण्यास अडचणी असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण २३ ऑगस्ट रोजी बोलावलेल्या बैठकीत आपणासोबत कोणत्या कामांचा आढावा घ्यावा, हा प्रश्न पडल्याने मी बैठकीस अनुपस्थित राहत आहे.’
‘गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तासगाव मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी ५० ते ६० कोटींच्या निधीची मागणी करीत आहोत. त्यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार व मंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटून अनेकदा पत्रही दिले. त्यानंतरही निधीसाठी टाळाटाळ झाली. त्यामुळे कोणत्या कामांच्या आढावा घेण्यासाठी मी बैठकीला जाणार होते. त्यामुळे मी बैठकीला येणार नसल्याचे त्यांना कळविले आहे.’ - सुमनताई पाटील, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष