आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांनी कोरोना संकट काळात कामगारांना विमा पॉलिसी देऊन आधार दिला आहे.
या पॉलिसीच्या माध्यमातून संबंधित कामगाराला कोरोना संसर्ग झाल्यास ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर, आयसीयू ,डॉक्टरांचा खर्च, प्री व पोस्ट हॉस्पिटलायझेशन, होम केअर ट्रीटमेंट व आयुष ट्रीटमेंटचा लाभ मिळतो. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी १५ दिवस व रुग्णालयातून घरी आल्यानंतर ३० दिवसापर्यंतचा खर्च या कोरोना कवच पॉलिसीमध्ये अंतर्भूत आहे.
डॉ. सतीश पाटील म्हणाले, अशोका ॲग्रो उद्योग समूहाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांसोबतच कामगारांचा मोलाचा वाटा आहे. कामगारांना गतवर्षी लॉकडाऊन काळात कंपनी बंद असतानाही शंभर टक्के पगार दिला होता. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अशोका ॲग्रोने आपल्या सर्व कामगारांना दीड लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणारी ‘कोरोना कवच’ ही विमा पॉलिसी देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.