लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंचीसह संपूर्ण आटपाडी तालुक्यातील खासगी वाहनचालकांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. खासगी वाहन चालवायचे कसे ? असा प्रश्न वाहनधारकांसमोर उपस्थित झाला आहे.
खासगी वाहनचालकांनी आपली वाहने बँक अथवा फायनान्सवर घेतली आहेत. कोरोनामुळे या वाहनांची चाके थांबली आहेत. वाहनचालकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे
मार्चपासून खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना याचा फटका बसला आहे. अनेक वाहनधारकांनी आपल्या व्यवसायात बदल केला आहे. विविध प्रकारांच्या वाहनांवर काढलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता वाहनमालकांना लागली आहे.
ऑटोद्वारे प्रवासी वाहतूक करून अनेक युवक आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत आहेत. कोरोनापासून या वाहतुकीला फटका बसल्याने ऑटो काळ्या पिवळ्या टुरिस्ट याबरोबर खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनधारक भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. भाजीपाला विक्रीसाठी वाहनांचा वापर करत आहेत.
काेट
कोरोनाच्या काळापासून वाहनांची चाके थांबली असून, आर्थिक चणचण भासत आहे. माझे वाहन फायनान्सच्या हप्त्यावर घेतले असून, वाहनांचे घेतलेलं कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्चपासून वाहन दारातच उभे असल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
- प्रवीण कडव
टुरिस्ट वाहनमालक, दिघंची
काेट
सध्या पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहन भाड्याने करून जाणे परवडेना झाले आहे. खासगी वाहतुकीला याचा फटका बसला आहे. वाहनाचे कर्ज फेडण्याबरोबर कुटुंबाचा गाडा चालविणे मुश्कील होत असून, आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
- शहाजी पवार, वाहनमालक, पांढरेवाडी