फोटो १ पॉलिटेक्निक मिरज
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अभियांत्रिकी महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नसल्याने त्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. विशेषत: खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची ससेहोलपट सुरू आहे.
अनेक खासगी महाविद्यालये पूर्वीपासूनच कमी वेतन देतात. पगारपत्रकावरील नोंदीच्या ५० टक्केच पगार हातात मिळतो. प्राध्यापकांनी त्यावरच समाधान मानत अभियंते घडविण्याचे पवित्र कार्य सुरू ठेवले होते. लॉकडाऊन काळात तोदेखील मिळणे बंद झाले. काही महाविद्यालयांनी त्यातही कपात केली. प्राध्यापक गमावणे संस्थांना जिकिरीचे होते, तर नोकरीवर पाणी सोडणे प्राध्यापकांना परवडणारे नव्हते. अशा कात्रीत सापडलेल्या स्थितीत लॉकडाऊनचा काळ काढावा लागल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तर शेतात काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता.
लॉकडाऊनमध्ये प्रवेश बंद असल्याने महाविद्यालयांची आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे काही संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे नोंद असलेल्या प्राध्यापकांनाही नारळ देण्याच्या हालचाली सुरू केल्यात. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना नसल्याने पगारासाठी दाद मागणेदेखील त्यांना मुश्किल आहे. प्रवेश झालेले नाहीत, शिष्यवृत्तीचे पैसे शासनाकडून जमा झालेले नाहीत, अशी कारणे सांगत पगार दिलेच नाहीत. तुलनेने शासकीय महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचे वेतन सुरू असल्याने लॉकडाऊन सुसह्य ठरले आहे.
चौकट
खासगी शिकवणीवर उपजीविका
काही प्राध्यापकांनी लॉकडाऊन काळात खासगी शिकवणी वर्ग सुरू करून चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग घेतले. शाळा बंद असल्याने पालकांनीही वर्गांना थोडाफार प्रतिसाद दिला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मात्र हाल झाले. काही कर्मचाऱ्यांना रेशनवरील धान्य खाऊन दिवस काढावे लागले. अजूनही परिस्थिती मार्गावर आलेली नाही.
चौकट
महाविद्यालयांची संख्या - १७
खासगी महाविद्यालये - १५
सरकारी महाविद्यालये - १५
प्राध्यापकांची संख्या - ५५००
शिक्षकेतर कर्मचारी - ३५००
विद्यार्थी क्षमता ४६२८
कोट
कोरोनापूर्वी पन्नास टक्केच पगार हातात मिळायचा. जूननंतर तोदेखील बंद झाला. संस्था खासगी असल्याने पगारासाठी दाद मागणेही शक्य नव्हते. त्यामुळे राजीनामा देणे पसंत केले.
- प्रा. किरणकुमार जगदाळे, सांगली
--------------