सांगली : लॉकडाऊन काळात कोणतीही सेवा मिळणे जिकिरीचे व त्रासदायी झाले असताना, सांगली पोस्ट कार्यालयाने व पोस्ट बँकेने लोकांच्या अडचणी दूर करण्याचे, त्यांच्या वेदना कमी करण्याचे तसेच त्यांच्या परंपरेचा मान राखण्याचे काम केले. विविध प्रकारच्या सेवा घरपोच देताना त्यांनी राज्यात सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये आघाडी घेतली.
‘डाकिया डाक लाया’ या गाण्यातील सेवांपेक्षाही वेगळ्या व सकारात्मक सेवा पोस्टाने दिल्या. नकारात्मकतेच्या, भीतीच्या, त्रासाच्या दाट छायेत अडकलेल्या लोकांना पोस्टाने आधार दिला. आधार लिंकिंगच्या माध्यमातून कोणत्याही बँकेतील पैसे काढण्यासाठी ते घरपोच करण्यासाठी जी सेवा पोस्टाने दिली, ती थक्क करणारी आहे. दरमहा दीड कोटीहून अधिकच्या रकमा पोस्टाने घरपोच केल्या. एप्रिल ते आजअखेर १ लाख ३० हजार व्यवहार करून ३२ कोटी ८८ लाख रुपयांचे वाटप पोस्टाने केले. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जन-धन योजना, किसान योजना यांचे पैसे काढण्यासाठी बँकांमधील भल्या मोठ्या रांगेत थांबणे महिला, शेतकरी, माता, ज्येष्ठ नागरिकांना अशक्य झाले होते. अशा काळात त्यांच्या मदतीला पोस्ट बँक धावून आली. अशा लोकांसह ऊसतोडणी कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी, महिला अशा अनेक घटकांची सेवा करून पोस्टाने मने जिंकली. अजूनही त्यांची सेवा सुरूच आहे.
चाैकट
आणखी काय मदत पोस्ट बॅंकेकडून झाली
लॉकडाऊन काळात परगावात किंवा मूळ गावी अडकलेल्या तसेच शारीरिकदृष्ट्या खचलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरी जाऊन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देण्याचे काम सांगली पोस्टाने केले. जिल्ह्यात ९६१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना असे घरपोच लाईफ सर्टिफिकेट देण्यात आले. लॉकडाऊन काळात आलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला जिल्ह्यात तब्बल १ लाख १० हजार राख्या सुटीदिवशी काम करून पोस्टमन व सेवकांनी पोहोच करून लोकांच्या सणांचा आनंद द्विगुणीत केला.
चाैकट
१२७५ विद्यार्थ्यांनी पोस्टात खाती काढली
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पोस्ट बँकेत खाती काढणे सुलभ होते. आजअखेर जिल्ह्यातील १ हजार २७५ विद्यार्थ्यांनी पोस्ट बँकेत खाती काढून त्याचा लाभ घेतला.
चाैकट
कामातून समाधान लाभले
जिल्ह्यात लॉकडाऊन काळात लोकांचा त्रास कमी करून त्यांना चांगली सेवा देता आली, याचे खूप मोठे समाधान आहे. यात आमचे सर्व कर्मचारी, पोस्टमन, डाकसेवक यांचे मोलाचे योगदान राहिले.
- खोराटे,
डाक अधीक्षक, सांगली
रूपयांचे पोस्ट बॅंकेकडून लॉकडाऊनच्या काळात घरपोच झाले वाटप ३२,८८,००,०००
एकूण झालेले व्यवहार १,३०,३९३
पोस्टमन, सेवकांनी दिली सेवा ७८०