विटा : विटा शहरात लहान अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास जबरदस्तीने प्रवृत्त केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक अमर शितोळे यांनी मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्याकडे सोमवारी केली.
विटा शहरात गेल्या काही महिन्यांपासून लहान मुलांना भीक मागण्यासाठी जबरदस्तीने रस्त्यावर पाठविले जात आहे. भीक मागणाऱ्या मुलांचे पालक नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी पध्दतीवर काम करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी उघडकीस आणले आहे. त्यामुळे कंत्राटी काम करणाऱ्या पालकांकडून मुलांना भीक मागण्यास पाठविणे अत्यंत घृणास्पद आहे. या मुलांच्या घरची परिस्थिती चांगली असताना या मुलांचे भवितव्य अंधारात ठेवून अशा पध्दतीने भीक मागायला लावणे हे माणुसकीलाही काळीमा फासणारे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा सर्व पालकांचा शोध घ्यावा, तसेच कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांच्या ठेकेदारांचीही चौकशी करावी. यात जे कोणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अमर शितोळे यांनी मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्याकडे केली.