अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी २०२४ च्या विधानसभेसाठी इस्लामपूर मतदारसंघात शरद पवार प्रणीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप तगडा उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहेत. परंतु हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला होता. राजकीय उलथापालथ पाहता, भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही अडसर येण्याचा शक्यता आहे.आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत प्रवेश झाल्यापासून आजअखेर इस्लामपूर मतदारसंघात त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार सापडला नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना आदी पक्षांचे प्रयत्न फोल ठरले आहेत. आता भाजप पक्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात आतापासूनच तयारी करीत आहे.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी तयारी केली असली तरी त्यांच्याच पक्षातील काही नेते अडसर करीत आहेत.त्यातच इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच आहे, असा नारा जिल्हा प्रमुख आनंदराव पवार देत आहेत. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानून शरद पवारांना टार्गेट करीत आमदार पदाचा मार्ग पुन्हा शोधत आहेत.गतविधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना पुरस्कृत गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांना आवाहन दिले होते. परंतु भाजपचेच नाराज असलेले निशिकांत पाटील यांच्या बंडखोरीने आ. जयंत पाटील यांची निवडणूक सोपी झाली. विशेषत: इस्लामपूर मतदारसंघात तगडा उमेदवार नाही. त्यातच जयंत विरोधी गटात एकवाक्यता नाही. काँग्रेस पक्षाचीही वाताहत, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला वाद उफाळला असला तरी आजही जयंत पाटील यांचे नेतृत्व या मतदारसंघात अबाधित आहे.
आ. जयंत पाटील यांच्या विरोधात असलेल्या सर्वच गटांसह भाजप-शिवसेना आणि अजित पवार प्रणित राष्ट्रवादीला एकत्रित करून २०२४ ची विधानसभा पुन्हा ताकदीने लढवणार आहोत. -गौरव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा दूध संघ