लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पालिका स्थापनेपासून स्वबळावर महिलांचे नेतृत्व लाभले नाही. राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील आणि काही बोटावर मोजण्याइतक्या नगरसेविका सोडल्या, तर उर्वरित नगरसेविकांचे पतीच पालिकेतील कारभार पाहतात. आगामी निवडणुकीत सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीला महिला उमेदवार शोधणे मोठे आव्हान ठरणार आहे.
२०१० जनगणनेनुसार शहरात २८ प्रभाग असतील. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने एका पार्टीकडून १४ महिलांना उमेदवारी द्यावी लागेल. एकूण पालिकेच्या रणांगणात दुरंगी लढतीसाठी कमीत कमी २८ महिला उमेदवारांची गरज आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाला महिला उमेदवार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सत्ताधारी विकास आघाडीमध्ये सक्षम अशा महिलांचे नेतृत्व नाही. आगामी पालिका निवडणुकीत अनिता ओसवाल, सुनीता महाडिक, अन्नपूर्णा फल्ले, शबाना मुल्ला, कोमल बनसोडे, सुप्रिया पाटील आदी महिला भाजपमधूून उभारण्याची शक्यता आहे, तर सीमा पवार, प्रतिभा शिंदे, पूूनमताई साळुंखे, वर्षा निकम या महिला उमेदवार शिवसेनेतून इच्छुक आहेत. परंतु राज्यात महाआघाडी सरकार असल्याने शिवसेना राष्ट्रवादीकडे झुकेल, असे स्पष्ट संकेत आहेत.
राष्ट्रवादीकडे महिला उमेदवारांची कमतरता भासणार आहे. आगामी निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, मनीषा पाटील, मिनाज मुल्ला, सुनीता सपकाळ, जयश्री माळी, सविता आवटी, नूतन भालेकर, जयश्री पाटील, संगीता कांबळे आदी महिला रणांगणात उतरतील. परंतु एखाद्याच वॉर्डात महिलांतूनही बंडखोर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्यथा १४ प्रभागांत महिलांमध्ये दुरंगीच लढती होतील. बहुतांशी आजी-माजी महिला नगरसेविकांचे पतीराजच पालिकेच्या राजकारणात कार्यरत आहेत. आगामी काळातही हीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे महिला उमेदवार शोधणे मोठे आव्हान राहणार आहे.
इस्लामपूर पालिका लोगो