सांगली : कोयना धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवून पूरस्थिती येणार नाही यासाठी सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रशासन यंत्रणा कार्यरत असून, येत्या ११ आॅगस्टपासून सुरू होणारा नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्व सोहळा विनाविघ्न पार पडण्यासाठी नदीतील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे झालेल्या बैठकीत, पूरस्थिती येणार नाही यासाठी पाण्याचा विसर्ग करण्याबाबत चर्चा झाली आहे. ११ आॅगस्टपासून नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्व सोहळा सुरू होत असून, या सोहळा कालावधित कृष्णा, वारणा व पंचगंगा या तीनही नद्यांची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे. सध्या कोयना धरणातून १८ हजार १९३ क्युसेक, तर वारणा धरणातून १२ हजार ४२० क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी पाच फुटापर्यंत वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. आयर्विन पूल येथे सध्या ३३.६० फुटावर असलेली पाणीपातळी ३९ फुटावर जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेक विसर्गकर्नाटकातील अलमट्टी धरणातून सध्यात १ लाख ७४ हजार २७५ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पूरस्थिती येणार नाही. तरीही कोयनेतून विसर्ग वाढला, तर पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
पूरस्थितीवर नियंत्रणाचे प्रयत्न
By admin | Published: August 08, 2016 11:15 PM