फोटो २६ महेशकुमार कोष्टी
फोटो २६ सदानंद कदम
फोटो २६ विठ्ठल मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या वर्षभरात विद्यार्थी फक्त ऑनलाईन शिक्षण घेताहेत. वही-पेनऐवजी मोबाईलच्या स्क्रीनवर त्यांची बोटे फिरताहेत. याचा परिणाम म्हणून हस्ताक्षरांची लय बिघडली असून लिखाणाची गतीही कमी झाली आहे. शिक्षक आणि काही शिक्षणतज्ज्ञांनी ही चिंतेची बाब समोर आणली आहे.
ऑनलाईन शिक्षणाचा दुष्परिणाम म्हणून ही बाब ठळकपणे समोर आली आहे. ऑनलाईन शिक्षण काळात विद्यार्थ्यांना मोजकाच अभ्यास मिळत राहिला. स्वाध्यायदेखील मोबाईलवरच करावे लागले. मोबाईलच्या वापराला मुले सरावली, पण त्याच्या दुष्परिणामांची दुसरी बाजूही समोर आली. त्यांचे लिखाण कमी झाले. वर्गात शिक्षकांकडून लिखाणावर भर दिला जायचा. उत्तरे घोटून घेतली जायची. या सगळ्याला विश्रांती मिळाली. काही मोजकेच लिखाण ऑनलाईनद्वारे दिले गेले, पण घरच्या घरी निवांत लिहिण्याची सोय असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची गती कमी झाली. आता दहावी-बारावीसह विविध वर्गांच्या परीक्षा तोंडावर असताना, पालकांना पाल्यांच्या लिखाणाची चिंता भेडसावू लागली आहे. घरात लिखाणासाठी बेंचसारखी व्यवस्था नसल्यानेही मुलांच्या लेखनशैलीत फरक पडल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चाैकट
विद्यार्थ्यांनो हे करा...
- परीक्षेच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा
- हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करा
- घरात पेपर सोडविताना किंवा लिखाण करताना योग्य उंचीच्या टेबल-खुर्चीचा वापर करा
- दिवसभरात किमान आठ-दहा पाने लिखाण करायलाच हवे
- परीक्षा काळात खात्री असलेल्या उत्तरांच्या लेखनाचा सराव करा
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांबाबत ही समस्या गंभीर आहे. त्यांना प्रत्यक्ष वर्गात असतानाही पुरेसे लिहिता येत नव्हते. ऑनलाईन शिक्षणातही पूर्ण क्षमतेने सहभागी नाहीत, त्यामुळे त्यांचे हस्ताक्षर, लेखनाची गती याबाबतीत चिंतादायक स्थिती आहे. त्यांचा शैक्षणिक पाया ठिसूळ राहण्याचा धोका आहे.
- सदानंद कदम, भाषातज्ज्ञ
वर्गात विद्यार्थ्यांच्या लेखनावर भर देत होते. ऑनलाईनमुळे हे सारे थांबले आहे. शिक्षण विभागाने स्वाध्याय शिक्षण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी ते मोबाईलबरोबरच वहीमध्येही लिहून घ्यावे असा आमचा आग्रह असतो. त्याद्वारे लिखाणाची सवय कायम ठेवण्याचा हेतू आहे. हस्ताक्षरांचे वळण मोडू नये यासाठी प्रयत्न आहेत.
- विठ्ठल मोहिते, अध्यक्ष, मराठी अध्यापक संघ
मुले घरात लिखाणाकडे दुर्लक्ष करतात. शिक्षकांचा प्रत्यक्ष दबाव नसल्याने निवांत अभ्यास करतात. अभ्यास भरपूर आहे, पण ऑनलाईनमुळे तो हातातून उतरत नाही. परिणामी मुलांचा लिखाणाचा सराव थांबला आहे. त्याचे दुष्परिणाम प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जाणवण्याचा धोका आहे.
- अनुजा कुलकर्णी, पालक
मोबाईलमुळे लिखाण थांबल्याचे वेळेत लक्षात आल्याने घरातच लिखाणावर भर दिला. मोबाईलवरचा अभ्यास वहीतदेखील नोंदविण्यावर लक्ष दिले. त्याचा फायदा झाला. स्वच्छ लेखन, गती यांचा सराव कायम राहिला. अन्यथा, मोबाईलमुळे मुलांचे अक्षर बिघडण्याची भीती होती.
- महेशकुमार कोष्टी, पालक