सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील विजय राजाराम पाटील यांनी नागाला अमानुष पध्दतीने हाताळून त्याचे व्हीडिओ शुटींग करुन प्रदर्शन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उप वन संरक्षक वन विभाग, सांगली यांच्यामार्फत देण्यात आली.याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे - कुची येथील विजय राजाराम पाटील यांनी नागाला अमानुष पध्दतीने हाताळून त्याचे व्हीडिओ शुटींग करुन प्रदर्शन केल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यावरुन वन परिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक सांगलीचे युवराज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन चौकशी केली व आरोपीविरुदध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत प्रथम गुन्हा दाखल केला आहे.
पुढील चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी सहायक वन्यजीव रक्षक सांगली जी. आर. चव्हाण यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. या प्रकरणी श्री. चव्हाण यांना पुढील चौकशी करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश उपवनसंरक्षक सांगली यांनी दिले आहेत.नागपंचमीच्या सणाच्यावेळी नाग / साप पकडून त्यांचे प्रदर्शन करण्याच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेवून अशा घटना घडणार नाहीत याबाबत सतर्क राहून नाग/ साप पकडण्याची प्रकरणे निदर्शनास आल्यास त्याची तातडीने दखल घेवून आरोपी विरुध्द कठोर कार्यवाहीच्या सूचना उपवनसंरक्षक सांगली यांनी वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाग/ साप पकडल्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत आरोपीस 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षेची तरतुद आहे.
उपवनसंरक्षक सांगली यांनी अशाच एका प्रकरणांत समाज माध्यमांवर झळकत असलेल्या चित्रफितीबाबत पोलिस विभागाच्या सायबर सेलच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेवून तात्काळ कायदेशीर कार्यवाहीच्या सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी, शिराळा तानाजी मुळीक यांना दिल्या आहेत. वनपरीक्षेत्र अधिकारी, शिराळा हे पुढील तपास करीत असल्याचे उप वन संरक्षक वन विभाग, सांगली कार्यालयातर्फे सांगण्यात आले.