सातारा : अजिंक्यतारा किल्ला रस्त्यावरील बागेपासून ते मंगळाई देवी मंदिरापर्यंतच्या परिसरात सोमवारी दुपारी अज्ञातांनी आग लावल्याने वणव्यात छोटे-मोठे वन्यजीव जळून खाक झाले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानंतर वनविभाग अन् पालिकेच्या अग्निशमन दलाने दोन तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबतची अधिक माहिती अशी की, अजिंक्यतारा किल्ल्यावर आग लागल्याची माहिती चैतन्य कदम यांनी पालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य संतोष शिंदे यांना दूरध्वनीद्वारे दिली. याची माहिती मिळताच शिंदे यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक, वनकर्मचारी, संतोष शिंदे व वन्यप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन घाणेरी पानांच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाचा बंब बोलविण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. यामध्ये दुर्मीळ वनसंपदा, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. (प्रतिनिधी)सातारा परिसरातील डोंगरावर आग लावण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते. त्यामुळे मोठी हानी होते. ती टाळण्यासाठी पोलिस, वन खाते व सातारा पालिकेने मोहीम राबवून किल्ल्यावर ज्वालाग्राही पदार्थ नेण्यास मनाई करावी.- संतोष शिंदे, सदस्य, वनसंवर्धन समिती, सातारा पालिका.
‘अजिंक्यतारा’वर आग
By admin | Published: February 27, 2017 11:23 PM