कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील स्वीट कन्फेन्शनरी या चॉकलेट कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग रविवारी सकाळपर्यंत विझविण्यास जवानांना यश आले.आगीत कारखान्यातील मशिनरी आणि पॅकेजिंगच्या साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची नोंद रविवारी रात्री उशिरापर्यंत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये झालेली नव्हती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुपवाड एमआयडीसीमध्ये स्वीट कन्फेन्शनरी या चॉकलेट कंपनीला शनिवार (दि. १८) रोजी मध्यरात्री अचानकपणे आग लागली. आगीमध्ये कारखान्यातील मशिनरी आणि पॅकेजिंगच्या साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पॅकेजिंग कागदाने आग भडकलीकंपनीत मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगचे कागद असल्यामुळे पुढील काही मिनिटांत ती भडकली. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत आगीचे लोट येणा-जाणाऱ्यांना दिसून येत होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. रविवारी सकाळी आग विझविण्यास त्यांना यश आले.
आग नेमकी कशामुळे लागली?या घटनेची नोंद रविवारी उशिरापर्यंत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली नव्हती. तसेच आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही; पण विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ती लागली असावी, अशी चर्चा कुपवाड एमआयडीसी परिसरात सुरू होती.