सांगली : सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
शिवकुमार यांच्या गोदामातील लोखंडी अॅगल, पत्रे वितळले होते. गोदामाशेजारी मधुकर हसबे यांच्या घरालाही आगीची झळ लागली. त्यांच्या घरावरील पाण्याची टाकी जळून खाक झाली. पाण्याच्या कनेक्शनच्या पाईपही जळून खाक झाल्या. खिडकीच्या काचाही फुटल्या.रामअवतार यांच्या तळमजल्यावरील प्लॅस्टिकच्या गोदामातही आग पसरली. प्लॅस्टिकचे सर्व साहित्य जळाले आहे. रामअवतार दुसऱ्या मजल्यावर राहतात. तिथेपर्यंत आग पसरली गेल्याने भिंती काळवंडल्या आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या सहा गाड्या लागल्या.
दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. नुकसानीचा आकडा स्पष्ट झालेला नाही. पण लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शिवकुमार व रामअवतार केवट यांनी सांगितले.