कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीलगत सावळी हद्दीत असलेल्या वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीमधील पॅटर्न ठेवलेल्या गोडाऊनला रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कास्टींग निर्मितीसाठी तयार केलेले लाखो रुपयांचे लाकूड आणि ॲल्युमिनियमचे पॅटर्न जळून खाक झाले. सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कंपनीचे कामगार व अधिकाऱ्यांनी सलग सात तास शर्तीचे प्रयत्न करून गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आणली.कुपवाड औद्योगिक वसाहतीलगत सावळी हद्दीत वेस्टर्न प्रेसिकास्ट ही फौंड्री आहे. या फौंड्रीमध्ये देश आणि विदेशातील विविध कंपन्यांसाठी लागणारे लोखंड आणि स्टीलच्या कास्टींगचे उत्पादन घेतले जाते. हे कास्टींग तयार करण्यासाठी लागणारे ॲल्युमिनियम आणि लाकडाचे पॅटर्न (तयार साचे) कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. देश विदेशातील विविध कंपन्यांकडून मालाची मागणी आल्यानंतर या पॅटर्नमध्ये लोखंड आणि स्टीलचा रस ओतून कास्टींग तयार केले जात होते.
फौंड्रीमध्ये असलेल्या या गोडाऊनमध्ये कोपऱ्यात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात कारणाने अचानक आग लागली. आग पाठीमागील बाजूस कोपऱ्यात लागली असल्याने या घटनेची लवकर कोणाला माहिती मिळाली नाही. त्यामुळे आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात उसळल्यानंतर ही घटना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निदर्शनास आली. अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाने तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. तत्काळ एमआयडीसी, महापालिका, शिरोळ दत्त कारखाना, कुरुंदवाड, तासगाव, जयसिंगपूर, आष्टा, विटा या नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सात तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.अग्निशमन दलामुळे संभावित नुकसान टळलेया आगीत गोडाऊनमध्ये ठेवलेले लाखोचे पॅटर्न जळून खाक झाले आहे. आग लागलेल्या ठिकाणी सुदैवाने कामगार नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोडाऊन लगत कास्टींगची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक मशिन ठेवली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व कंपनीचे कामगार व अधिकारी यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे सदर मशिनला कोणतीही हानी पोहोचली नाही. त्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान टळले, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने शेजारील प्लास्टिक कंपनीला आगीची झळ बसली नाही.