सोबत सांगली शासकीय रुग्णालयाचा फोटो मेलवर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली आणि मिरजेतील शासकीय रुग्णालयांचा अनेक वर्षांपासून आगीशी खेळ सुरू आहे. आगविरोधी कोणतीही यंत्रणा सुसज्ज नसून त्याविषयी प्रशासन बेफिकीर आहे.
रुग्णालयांतील अग्निरोधक यंत्रणा आणि फायर ऑडिट ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, पण हा विभाग आणि सिव्हिल प्रशासन परस्परांवर जबाबदारी ढकलून रिकामे होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
कोरोनाकाळात जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, त्यानुसार महापालिका अग्निशमन विभागाने ऑडिट करून अहवाल सादर केला होता. त्यात शासकीय रुग्णालयांतील धोकादायक स्थिती समोर आली होती.
रुग्णालयांत नव्या इमारती उभारल्या तरी तेथे अग्निविरोधी यंत्रणा उभारली नाही. स्वतःच्या मानसिक समाधानासाठी काही एक्स्टीन्गिशर अडकविले, तेदेखील अपडेट रहावेत यासाठी वेळोवेळी लक्ष दिले जात नाही.
सांगली शासकीय रुग्णालयाचा अंतर्भाग फारच चिंचोळा आहे. पुरेशी हवा खेळत नाही. आग लागलीच तरा मोठी जीवितहानी संभवते, पण लक्षात कोण घेतो? फायर ऑडिट केले नसल्याबद्दल रुग्णालयांचा वीज, पाणीपुरवठा बंद करण्याचे अधिकार अग्निशमन विभागाला आहेत, पण सार्वजनिक संस्था असल्याने व रुग्णांची गैरसोय विचारात घेऊन तशी कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर तरी सिव्हिल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
चौकट
सिव्हिलच्या दारात रुग्णवाहिका पेटली
तीन महिन्यांपूर्वी सांगली शासकीय रुग्णालयात एक छोटी रुग्णवाहिका रुग्ण घेऊन आली होती. रुग्ण व नातेवाईक उतरल्यानंतर काही क्षणांतच तिच्या इंजिनमध्ये आग लागली. ती विझविण्यासाठी एक्स्टीन्गिशर मिळवेपर्यंत सर्वांचीच पळापळ झाली. दोन एक्स्टीन्गिशर सुरूच झाले नाहीत. सुरक्षारक्षकांनी एकाच्या मदतीने आग कशीबशी नियंत्रणात आणली.
----------------------------