सांगली : मार्केट यार्डात असणाऱ्या पिरॅमिड लाईफ सायन्स या शेती औषधांच्या गोदामाला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. शेती औषधांसह द्रावणांचाही समावेश असल्याने अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील धोका टळला. या आगीत अंदाजे चाळीस लाखांचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्केट यार्डातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या डाव्या बाजूला आतमध्ये अभिजित थोरात यांचे पिरॅमिड लाइफसायन्स नावाचे दुकान आहे. शेतीसाठी लागणारी औषधे, द्रावणांसह इतर साठा होता. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आगीची घटना समोर आल्यानंतर तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलास कळविण्यात आले.
अग्निशमन दलाचे पथक दोन वाहनासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गोदामाला असलेली कुलपे तोडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोदामात कागदी पुठ्ठ्यांमध्ये औषधे असल्याने आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले होते. या ठिकाणी काही केमिकलही होती; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यास झळ बसू न दिल्याने पुढील अनर्थ टळला. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
महापालिकेचे अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्यासह बिळाप्पा हिंचगिरे, विक्रम घाडगे, फायरमन कासाप्पा माने, रामचंद्र चव्हाण, सुधीर मोहिते, अमोल गडदे, मयूर काशीद, आदींनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे.