लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील हरी ओम फूड प्रॉडक्ट्स या फरसाण व बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला शनिवारी सकाळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
सावळीमध्ये तानंग रस्त्यावर सुरेश माळी यांचा हरी ओम फूड प्रॉडक्ट्स हा फरसाण निर्मितीचा कारखाना आहे. शनिवारी सकाळी सहाच्यासुमारास या कारखान्यातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे रखवालदाराच्या निर्दशनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती मालक माळी यांना दिली. माळी यांनी आगीची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला फोनवरून दिली. अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल झाला.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन वाहनांच्या मदतीने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती मिळाली.
कच्चा व तयार झालेला फरसाण तसेच बेकरी उत्पादन व मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.