विटा : पारे-बामणी (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर पॉवर लिमिटेड या साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास घडली. बॉयलरला इंधन म्हणून पट्ट्याच्या साहाय्याने बगॅस टाकत असताना ही आग लागल्याचे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले.उदगिरी शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. बुधवारी रात्री कारखाना सुरू असताना इंधन म्हणून पट्ट्याच्या (बेल्ट कन्व्हेअर) साहाय्याने बगॅस टाकत असताना अचानक बगॅसला आग लागली. त्यामुळे पट्ट्याने पेट घेतला. त्यावरील बगॅसमुळे आग वाढत गेली आणि वाऱ्यामुळे ती इतरत्र पसरली. या आगीत कारखान्याचे बॉयलरला बगॅस पुरवठा करणारे सुमारे ९८० मीटरचे पट्टे जळून खाक झाले. पट्टे चालविण्यासाठी असणारे तीन इलेक्ट्रीक पंप, तारा, इलेक्ट्रिक फिटिंग, चौदाशे रोलर्स आदी साहित्यही जळाले. शिवाय सुमारे १२ हजार मीटरच्या जागेवर साठविलेला बगॅसही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. बगॅसला आग लागताच कारखान्याच्या अग्निशामक विभागातील पाण्याच्या टॅँकरचा वापर करून कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाऱ्यामुळे आग आटोक्यात न आल्याने विटा, तासगाव नगरपरिषद, सोनहिरा, हुतात्मा, क्रांती साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले. सुमारे सहा ते सात तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. विटा पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून, हवालदार आर. डी. अवघडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
‘उदगिरी’च्या बगॅसला आग
By admin | Published: January 07, 2016 11:51 PM