मिरज : रेल्वेत फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मिरज स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाने पकडले. संबंधित प्रवाशाकडील फटाके जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी परळी – मिरज पॅसेंजर मिरज स्थानकावर पोहोचल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक राकेश कांबळे व श्वान पथकातील कर्मचारी चेतक व खंड्या या श्वानांसोबत स्थानकावर नियमित तपासणी करीत होते. यावेळी पॅसेंजर गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या प्रवाशांपैकी एकजण कापडी पिशवीत काही वस्तू घेऊन जात होता. चेतक या श्वानाने त्याच्या कापडी पिशवीचा वास घेतला. स्फोटक पदार्थांचे प्रशिक्षण मिळालेल्या चेतकने त्याच्या हॅण्डलर जवानाला काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा केला. त्यामुळे संबंधित प्रवाशाची चौकशी केली. तेव्हा त्याने पिशवीत काही फटाके आणल्याचे कबूल केले.स्फोटके व ज्वालाग्राही वस्तू घेऊन रेल्वेतून प्रवास करणे हा गुन्हा असतानाही असे कृत्य केल्याबद्दल प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात नेले. त्याचा जबाब नोंदवून व रेल्वे कायद्याच्या उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवासात स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ॲसिड घेऊन प्रवास करू नये. प्रवासादरम्यान धूम्रपान करु नये, असे केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
Sangli: रेल्वेतून फटाके नेणाऱ्यास श्वानाने पकडले, मिरज स्थानकावरील घटना; गुन्हा दाखल
By अविनाश कोळी | Published: September 20, 2023 6:53 PM