सांगली : येथील खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव व सांगली-मिरज महापालिका स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जागेचा वाद शुक्रवारी पुन्हा उफाळून आला. पाटील जागेचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर जाधव यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीनवेळा गोळीबार केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. सांगलीचे उपनगर असलेल्या संजयनगरकडे जाणाऱ्या रेल्वे ब्रीजजवळ शिंदे मळ्यात सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी जाधव व पाटील यांच्या गटाने संजयनगर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटांच्या २० जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यातील जाधव व पाटील यांच्यासह दहाजणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये जाधव गटाचे दिगंबर गणपतराव जाधव (वय ५७), दिलीप गणपतराव जाधव (६३), दीपक गणपतराव जाधव (५५), रणजित दिलीप जाधव (३०, सर्व रा. खणभाग, सांगली), तर पाटील गटाचे सभापती संतोष शिवदास पाटील (३९, सह्याद्रीनगर, सांगली), जागेचे मूळ मालक विकास बाजीराव गोंधळे (४६), आशिष बाजीराव गोंधळे (४६), प्रगती अशोक काटे (५४), साधना शंकर कांबळे (५१), अभिजित विकास गोंधळे (२८, सर्व रा. सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सांगली) यांचा समावेश आहे. या सर्वांना शनिवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील आणखी काही लोकांना अटक करण्यात येणार आहे. पाटील शुक्रवारी सकाळी या जागेवर तारेचे कुंपण घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव व त्यांच्या कुटुंबाने त्यांना विरोध केला. जागेचा ताबा पाहिजे असेल, तर २५ लाख रुपये दे, अशी मागणी जाधव यांनी केली. पाटील यांनी जागा माझ्या नावावर आहे, असे सांगितले. यातून त्यांच्यात वाद झाला. मारामारी होणार असे वाटल्याने जाधव यांनी रिव्हॉल्व्हरमधून माझ्या दिशेने तीनवेळा गोळीबार केला असल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा जमाव जमविणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान दिगंबर जाधव यांनीही पाटील गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘व्हिडीओ क्लिप’ प्रसारित दिगंबर जाधव गोळीबार करीत असताना व रिव्हॉल्व्हरमधून गोळी कशी बाहेर पडली, याचे एकाने मोबाईलवर चित्रीकरण केले आहे. सात सेकंदाच्या या चित्रीकरणाचा सायंकाळपर्यंत सोशल मीडियावरून प्रसार झाला. चित्रीकरण कोणी केले, याचा पोलीस शोध घेत आहेत. रिव्हॉल्व्हर जप्तजाधव यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोसिांनी जप्त केले आहे; पण त्यांच्या रिव्हॉल्व्हरचा परवाना होता का, याची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाईल, असे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी सांगितले.
सांगलीत जागेच्या वादातून गोळीबार
By admin | Published: October 30, 2015 11:05 PM