ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथे व्याह्याने व्याह्यावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. यात पंडित शामराव पाणिरे यांच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. आपल्या सुनेने आत्महत्या केली असून, त्याचा बदला घेण्यासाठीच तिचे वडील सर्जेराव लक्ष्मण शिंदे (रा. भवानीगर, विटा) व त्यांच्या पाच साथीदारांनी गोळीबार केल्याची फिर्याद पाणिरे यांनी कुरळप पोलिसांत दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पंडित पाणिरे नेहमीप्रमाणे घराबाहेरील कट्ट्यावर झोपले होते. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान तोंडाला कापड बांधलेल्या सहा लोकांनी काही अंतरावरून झोपलेल्या पाणिरे यांच्या दिशेने बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या, परंतु हल्लेखोरांचा नेम चुकला. एक गोळी पाणिरे यांच्या (पान १ वरून) डाव्या हाताला लागली. दचकून जागे झालेल्या पाणिरे यांनी पळत जाऊन शेजारच्या घरात आश्रय घेतला. गोळीबार व आवाजामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. त्यानंतर परिसरातील लोकांनी कुरळप पोलिसांना घटनेची माहिती दिली. कुरळप पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जखमी पाणिरे यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पाणिरे यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, आपली सून उज्ज्वला हिने दोन वर्षांपूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येस मीच कारणीभूत असल्याचा राग तिचे वडील सर्जेराव लक्ष्मण शिंदे यांच्या मनात आहे. या रागातूनच त्यांनी पाच साथीदारांसह माझ्यावर गोळीबार केला.दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे व गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी श्वानपथक आणले होते. ते काही अंतरावर जाऊन घुटमळले.‘अरे बघतोस काय, लवकर बार काढ’दोन वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवातच उज्ज्वलाने आत्महत्या केली आहे. त्याचा बदला म्हणून ऐन घटस्थापनेदिवशीच पंडित पाणिरे यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची चर्चा आहे. पाणिरे परिसरात वादग्रस्त म्हणून परिचित आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमके कोण असेल, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. गोळीबार करणारे हल्लेखोर सराईत नसावेत. कारण गोळीबार करणाऱ्याला त्याचा एक साथीदार ‘अरे बघतोस काय, लवकर बार काढ’, असे ओरडून सांगत होता, अशी माहिती स्वत: पाणिरे यांनी दिली.
व्याह्याचा व्याह्यावर गोळीबार
By admin | Published: October 13, 2015 11:39 PM