सांगली : अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने आणि ब्रिटिशांविरोधात दिलेल्या जोरदार लढ्यातून स्वातंत्र्य मिळाले असले तरी, त्यांच्या बलिदानाला उचित सन्मान देत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या सांगलीतही नेहमीच स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. अगदी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेला पहिला स्वातंत्र्यदिनही असाच अविस्मरणीय होता. सोमवारी ७० व्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ज्याठिकाणी साजरा होणार आहे, त्याचठिकाणी पहिला स्वातंत्र्यदिन साजरा झाला होता, हे विशेष. सांगली जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारकांनी ताकदीने सुरू ठेवलेला स्वातंत्र्यलढा संपूर्ण देशभर गाजला. त्यामुळे ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्याचा हा सोहळा उत्साहात साजरा झाला नसता तर नवलच. स्वातंत्र्यलढ्यावेळी सांगली व मिरज येथे संस्थाने अस्तित्वात होती. त्यामुळे संस्थानांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सांगलीतील राजवाडा परिसरात झालेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावेळी चिंतामणराव पटवर्धन राजे दुसरे यांनी राष्ट्रध्वज फडकविला होता. राजवाड्यासमोर झालेला हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला होता. यावेळी पोलिसांची परेडही झाली होती. स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन करण्यात येणार आहेत हे माहीत असूनही सांगली संस्थानात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थानचे सर्व अधिकारी व सरंजामदार उपस्थित होते. सांगली हायस्कूलच्या मैदानावर यावेळी मुलांचे दिमाखदार संचलन झाले होते. विशेष म्हणजे पहिला स्वातंत्र्यदिन ज्या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला होता, त्याचठिकाणी सोमवारी मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी) मिरजेत लक्ष्मी मार्केटला रोषणाईचा साज मिरज संस्थानातही पहिला स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला होता. शहरात पूर्वी किल्ला भागात असलेल्या पोलिस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी संस्थानचे नारायणराव तात्यासाहेब पटवर्धन राजे यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने मिरजेतील लक्ष्मी मार्केटला रोषणाई करण्यात आली होती.
राजवाड्यातील पहिला स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय
By admin | Published: August 15, 2016 1:19 AM