येळावी : बांबवडे (ता. पलूस) येथे १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लाल मातीतील कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानात लाखो रुपयांची बक्षिसे जदली जाणार असून, पाच लाख रुपये इनामाची पहिली कुस्ती होणार आहे.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गेली ६९ वर्षे बांबवडे येथे कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. छोटे गाव व शेतीव्यतिरिक्त कोणतेही मोठे उत्पन्नाचे साधन नसताना कुस्ती मैदानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा करणारे हे एकमेव गाव आहे. मैदानात १०० रुपयांपासून पाच लाखांपर्यंतच्या निकाली कुस्त्या लावल्या जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, पंजाब, कर्नाटक व इतर राज्यांतील मल्ल मैदानास उपस्थित राहणार आहेत.
मैदानात माऊली जमदाडे विरूध्द हरियाणा केसरी अजय गुजर यांच्या पहिल्या क्रमांकाची ५ लाख रुपये इनामाची लढत होणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख विरूध्द समाधान पाटील यांच्यात लढत होणार असून यासाठी तीन लाख रूपये इनाम जाहीर करण्यात आले आहे. तिसºया क्रमांकाची दोन लाख रूपये इनामाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे व अक्षय शिंदे यांच्यात होणार आहे, तर चौथ्या क्रमांकाची लढत गोकुळ आवरे व समीर देसाई यांच्यात होत असून यासाठी एक लाख रूपये इनाम आहे. याशिवा दहा लाखापर्यंत विविध लढती रंगणार आहेत.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पहेलवानांचे योगदान मोठे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या स्थापनेमध्ये कुंडल येथील जी. डी. (बापू) लाड यांच्याबरोबर बांबवडे येथील स्वातंत्र्यसेनानींची संख्या मोठी होती. स्वातंत्र्य लढ्याबरोबर समाजहितासाठी योगदान देणाºया भगवान पवार, कोंडीबा संकपाळ, धोंडीबा संकपाळ, गणू डुबल, जयसिंग पवार, नारायण संकपाळ, शंकरराव (काका) पाटील, शिदू पवार, दत्तात्रय पाटील यांनी उत्कर्ष कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कुस्ती मैदानाची परंपरा सुरू केली. नावाजलेल्या महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी मल्लांनी हे मैदान गाजविले आहे. हंगामातील पहिलेच मैदान असल्याने यावर्षीही अनेक दिग्गज मल्ल या मैदानात उतरणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत वस्तादही पठ्ठ्याची मल्लविद्या आजमावण्यासाठी त्याला या मैदानात उतरवणार आहेत.कुस्ती हंगामाचा बांबवडेतून प्रारंभबांबवडे येथील कुस्ती मैदानापासून महाराष्ट्रातील कुस्ती मैदानाच्या आयोजनाची सुरुवात होते. या मैदानानंतर पलूसला श्रावण सोमवारी, कुंडल येथे अनंत चतुर्दशीनंतरच्या रविवारी आणि देवराष्ट्रे, बलवडी येथील मैदानांचे नियोजन होते, अशी माहिती उत्कर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील व ताहेर मुल्ला, लाला पवार यांनी दिली.