सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे.मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी बुधवारी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. ७ फेब्रुवारीला भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात होईल. १६ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण महोत्सव चालणार आहे. त्यानंतर पहिला मस्तकाभिषेक १७ रोजी होणार आहे.या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी व त्यागीगण सहभागी झाले आहेत. श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमानसागर महाराज, चंद्रप्रभूसागर, पंचकल्याणसागर, देवनंदी महाराज, पद्मनंदी महाराज व त्यांचे २० त्यागी, विशुद्धसागर महाराज व त्यांच्यासमवेत ३५ त्यागी, पुष्पदंत सागर महाराज यांच्यासमवेत १ त्यागी, याशिवाय जिनसेन महाराज, सच्छिदानंद महाराज, वासूपुज्य देवसेन महाराज, अमितसागर महाराज, आदर्शसागर महाराज, प्रसन्नश्रुषीजी महाराज, मुनीश्री चिन्मयसागर (जंगलवाले बाबा), गणिनी आर्यिका जिनमती माताजी, क्षमाश्री माताजी, विभाश्री माताजी यांचे आगमन झाले.दररोज चार लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भोजन व्यवस्थेची जबाबदारी कोलकाता येथील जैन समाजाने स्वीकारली आहे. साखर, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, मसाले, केसर, काजू, चहा, कॉपी, फळे, भाजीपाला व इतर भोजन सामग्री दान स्वरुपात येत आहे. सांगली, बेळगाव, चिक्कोडी, अथणी, जमखंडी या परिसरातून ५०० टनाहून अधिक साहित्य पाठविण्यात आले आहे. महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन (चेन्नई), कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र कुमार (बेंगलोर), सचिव सतीश जैन (दिल्ली), राकेश सेठी (कोलकाता) सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.सांगली, कोल्हापूरसाठी २३ रोजी अभिषेकाची संधीभगवान बाहुबलींच्या मूर्तीवर सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील जैन श्रावक-श्राविकांसाठी २३ फेब्रुवारी रोजी अभिषेक करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभिषेकसाठी कलश नोंदणीचे काम सुरू आहे. तरी या ३ जिल्ह्यांतील भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ फेब्रुवारीला पहिला मस्तकाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:36 AM