सांगली : प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच, लवकरच होत असलेल्या निवडणुकीच्या कामकाजास सध्या तरी प्राधान्य असणार आहे, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केले.
बुधवारी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. चौधरी यांची सांगलीचेजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्रीच त्यांनी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. गुरुवारी सकाळी प्रथमच ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण कार्यालय हजर होते. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास देशमुख यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी मीनाज मुल्ला, विजया यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्वागतानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, भविष्यातील कामकाजाचे नियोजन सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. येत्या काही महिन्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याने, त्याच्या योग्य नियोजनास प्राधान्य देणार आहे. आचारसंहितेअगोदर प्रभावी उपाययोजना करणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याने अधिकारी, कर्मचाºयांच्या समन्वयाने निवडणुकीचे कामकाज करणार आहे.
जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, त्यांची सोडवणूक करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल.प्रशासकीय कामकाज करताना टीमवर्कला महत्त्व देतो. त्यामुळे येथेही सर्वांना बरोबर घेऊनच कामकाज केले जाईल. मात्र, जे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक कामास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
सांगलीतही ‘टास्क फोर्स’ची स्थापनाजनतेची कामे लवकर व्हावीत यासाठी नियोजन करणार आहे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत ‘टास्क फोर्स’ होता. त्या पद्धतीने येथेही त्याची स्थापना करणार आहे. कोणत्याही कामाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक ‘टाईम बॉण्ड’ दिला जाईल. त्या मुदतीतही काम झाले नाही, तर त्याचा खुलासा अधिकारी, कर्मचाºयांना द्यावा लागेल. खुलासा योग्य वाटला नाही, तर टाळाटाळ, हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सांगलीत गुरूवारी नूतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांचे महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्वागत केले.