सांगली : लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडावी, यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या इव्हीएम यंत्रणेची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) आज जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या उपस्थितीत मिरज येथील वैरण बाजारमधील धान्य गोदामामध्ये झाली.
यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांना प्रात्यक्षिकांद्वारे इव्हीएम मशीन यंत्रणा व मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, सर्व तालुक्यातील निवडणूक नायब तहसीलदार, जिल्ह्यातील सर्व आय.टी.आय़. मधील 65 मास्टर ट्रेनर्स आदि उपस्थित होते.
यापूर्वी प्राप्त इव्हीएम मशिन्स भारत इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील मशिन्स इतर जिल्ह्यांना देण्यात आल्या. त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. हैदराबाद या कंपनीच्या मशिन्स प्राप्त झाल्या आहेत.
यामध्ये 3 हजार 266 कंट्रोल युनिटस् (सी. यू.), 5 हजार 618 बॅलेट य़ुनिटस् (बी. यू.) आणि 3 हजार 530 व्हीव्हीपॅट मशिन्स आहेत. या सर्व यंत्रणेची तपासणी पूर्ण होईपर्यंत साधारणतः 2 आठवडे ही प्रथमस्तरीय तपासणी सुरू राहणार आहे.मतदान प्रक्रियेतील इव्हीएम यंत्रणा हा सर्वात महत्त्वाचा घटक असून, याची माहिती सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे. व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदान नोंदविले गेले आहे किंवा नाही, कोणाला नोंदवले गेले आहे, हे मतदाराला कळते, असे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, निर्भय, निःपक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात व्हाव्यात, मतदारांनी इव्हीएम यंत्रणेवर विश्वास ठेवावा आणि मतदारांचा या यंत्रणेबाबत शंका, संभ्रम दूर व्हावा, यासाठी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे.
यापूर्वी 2 हजार 700 ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जवळपास 1 लाख, 37 हजार लोकांनी हे प्रात्यक्षिक पाहून खात्री करून घेतली आहे. आताही मतदारांनी हा यंत्रणेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.यावेळी तज्ज्ञांनी अद्ययावत अशा एम 3 सिरीजमधील कंट्रोल युनिट, बॅलट य़ुनिट, व्हीव्हीपॅट आदिंच्या प्रत्येक भागाबद्दल सूक्ष्म माहिती दिली. उपस्थित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इव्हीएम मशीनची हाताळणी करून त्यातील तांत्रिक बारकावे समजून घेतले.