शरद जाधव ।सांगली : देशातील सर्वाधिक मोठी बेदाण्याची बाजारपेठ म्हणून सांगलीचा नावलौकिक वाढत आहे. यंदा बेदाण्याच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. यंदाचा हंगामही १५ मेपर्यंत वाढण्याची शक्यता असून, सध्या प्रतिकिलो १२० ते १७० रुपयांपर्यंत बेदाण्यास दर मिळत आहे. यंदा पिवळ्या बेदाण्याबरोबरच काळ्या बेदाण्यालाही परदेशात मागणी वाढल्याने विक्रमी निर्यात झाली आहे.
गेल्या तीन वर्षात बेदाण्याला अपेक्षित दर मिळाला नसल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा मात्र हिरव्या, पिवळ्या बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातही बेदाण्यास चांगली मागणी आहे. दरवर्षी सांगली, पंढरपूर, विजयपूर, सोलापूर भागातून १४ हजारांवर गाडी बेदाण्याची आवक होत असते. चालूवर्षी उजनी धरणातून सोलापूर भागाला व अलमट्टी धरणातून कर्नाटकात पाणी पोहोचल्याने द्राक्षक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळेच दरवर्षी फेब्रुवारीत सुरू होऊन एप्रिलमध्ये संपणारा बेदाण्याचा सिझन अजून महिनाभर चालणार आहे. बेदाणा सौदे होत असलेल्या सर्वच ठिकाणी एप्रिल महिन्यातही १०० गाड्यांच्या वर माल येत आहे.पिवळे, काळे बेदाणे : निर्यातीत वाढआखाती देशात इराणमधून येणाºया बेदाण्याची आवक कमालीची घटल्याने त्याचा फायदा भारतातील बेदाण्यास होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला पिवळ्या बेदाण्याचा दर १४० ते १८५ रुपयांपर्यंत होता. निर्यात वाढल्याने पिवळ्या बेदाण्याचे क्षेत्रही वाढले आहे. आजवर २०० ते ३०० गाडी माल तयार होत होता. यंदा तो हजार गाडीवर गेला असून, त्यातील ७०० वर गाडी माल विकला गेला आहे. हिरव्या बेदाण्यातील वेस्ट असलेल्या काळ्या बेदाण्यासही परदेशात मागणी वाढल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षीपर्यंत ३० ते ५० रुपये दराने विकल्या जाणाºया काळा बेदाण्यास आता ७० ते १०० रुपये दर मिळत आहे.साठवण क्षमतेत वाढसांगली जिल्ह्यात ८० कोल्ड स्टोअरेजच्या माध्यमातून बेदाण्याची साठवणूक होते. आता त्यात वाढ झाली असून २० स्टोअरेज वाढली असून १०० स्टोअरेजमध्ये १६ हजार गाडी बेदाण्याची साठवणूक होत आहे. विजयपूर, पंढरपूर येथेही २ हजार गाडी बेदाणा साठवणूक होईल इतकी स्टोअरेज उपलब्ध आहेत.बेदाणा उत्पादकांत समाधानगेल्या तीन वर्षापासून अपेक्षेपेक्षा कमी दरामुळे बेदाणा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. यंदा मात्र दरात झालेली वाढ शेतकºयांना फायद्याची ठरली आहे. द्राक्षांच्या मार्केटिंगमध्ये वाढत चालेली जोखीम लक्षात घेता, पुन्हा एकदा बेदाण्यास शेतकरी प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
हिरवा बेदाणाही तेजीतहिरव्या बेदाण्यास संपूर्ण भारतात मागणी असते. तर श्रीलंका आणि बांगलादेशातही निर्यात होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये १४० पर्यंत दर होता. आता त्यात वाढ झाली असून, सध्या १६० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. संपूर्ण देशात १२ हजार गाडी माल लागत असताना यंदा गेल्यावर्षीपेक्षा हिरवा बेदाण्याची आवक कमी आहे. एका गाडीमध्ये सरासरी दहा टन बेदाणा असतो.
सांगलीतील बेदाणा बाजारपेठेचा देशभरात नावलौकिक निर्माण झाला आहे. या बाजारपेठेवर विश्वास ठेवणारे व्यापारी, शेतकरी व इतर सर्व घटकांमुळेच हे शक्य झाले आहे. यापुढेही बाजार समितीच्या माध्यमातून अधिकाधिक सोयी देण्यास प्राधान्य देणार आहे.-दिनकर पाटील, सभापती, बाजार समिती, सांगली.