जत : तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून मेंढपाळ कुटुंबीयांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.खंडनाळ (ता. जत) येथील शेतकरी कुटुंबातील एक मेंढपाळ संभाजी रामू कुलाळ (वय ४५) यांचा शेळ्या-मेंढ्यांकरिता पाणी काढण्यासाठी शेततळ्यात गेले असता तुकाराम हाजीबा थोरात यांच्या शेततळ्यात पडून मृत्यू झाला होता. या घटनेकडे कोणीही लक्ष न दिल्याने तम्मनगौडा रवीपाटील यांनी थेट गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना भेटून जाब विचारला. शासनाने आपला प्रतिनिधी पाठवून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित मेंढपाळाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.सध्या भीषण पाणीटंचाई असल्यामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र, या घटनेची शासकीय पातळीवर दखल घेतली नाही. ही बाब खेदाची आहे, असे रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मोठे टँकर दिल्याने वाड्यावर पाणीपुरवठा करणे कठीण होत आहे. त्याऐवजी १२ हजार लिटरचे छोटे टॅंकर द्यावेत, अशी मागणी रवीपाटील यांनी केली. यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, संजय गडदे, हनमंत गडदे, राजू पुजारी उपस्थित होते.दुष्काळाचा बळीजत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषत: मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांना पिण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष आहे. शेळ्या-मेंढ्यांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यात गेले असता सदर मेंढपाळाचा मृत्यू झाला. जनावरांना पाणी देण्यासाठी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला ही बाब गंभीर असल्याचे रवीपाटील यांनी सांगितले.