वाळवा (जि.सांगली) : येथील जिल्हा परिषद गटातील रयत विकास आघाडीच्या उमेदवार प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार स्मिता भोसले यांच्या घरासमोर जल्लोष केल्याने, स्मिता यांचे पती विक्रमसिंह भोसले यांनी हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर नायकवडी यांच्या कार्यकर्त्यांनी भोसले यांच्या घरावर हल्ला करून दगडकेली. त्यानंतर पुन्हा भोसलेंनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने आकाश दिनकर खवरे (वय २२, रा. वाळवा) जखमी झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. वाळव्यात रयत विकास आघाडीच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी व राष्ट्रवादीच्या स्मिता भोसले यांच्यात लढत झाली. यामध्ये नायकवडी विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अमोल मुळीक हा कार्यकर्ता दुचाकीच्या पुंगळ्या काढून दुचाकीवरून गावात फेऱ्या मारत होता. माळभाग परिसर, हुतात्मा चौक परिसरातून तो पराभूत उमेदवार भोसले यांच्या घरासमोर गेला. हा प्रकार पाहून भोसले यांचे पती विक्रमसिंह यांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत होणार, तेवढ्यात भोसले यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. हा प्रकार पाहून मुळीक तेथून निघून गेला. (वार्ताहर)स्वसंरक्षणार्थ घरातच गोळीबारगोळीबाराच्या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले. रयत विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भोसले यांच्या घरासमोर जमा झाले. त्यांनी भोसलेंच्या घरावर दगडफेक केली. तेथील मोटार व पाच दुचाकींची मोडतोड केली. जमाव घरात घुसून साहित्याची नासधूस करीत असल्याचे लक्षात येताच भोसलेंनी पुन्हा स्वसंरक्षणार्थ घरातच चार ते पाचवेळा गोळीबार केला. यामध्ये आकाश खवरे हा तरुण गोळी लागल्याने जखमी झाला. त्याच्या हातात गोळी घुसली आहे. त्याला उपचारार्थ इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल केले. भिंतीवर चार ते पाच गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. गोळीबाराच्या आवाजाने कार्यकर्त्यांनी तेथून पलायन केले.
वाळव्यात पराभूत उमेदवाराच्या पतीचा गोळीबार; एक जखमी
By admin | Published: February 23, 2017 10:48 PM